जेएनएन, मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर नागरी विमान वाहतूक क्षेत्रात मोठी कारवाई करण्यात आली आहे. अपघाताच्या पार्श्वभूमीवर तपास सुरू असताना नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) VSR कंपनीविरुद्ध कठोर पाऊल उचलत त्यांच्या चार लिअरजेट विमानांच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे.

DGCAची मोठी कारवाई
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) ने VSR कंपनीच्या Learjet 40/45 मॉडेलच्या चार विमानांचे विशेष तांत्रिक ऑडिट केले होते. या तपासात काही गंभीर तांत्रिक उणीवा आढळून आल्याने संबंधित सर्व विमानांचे उड्डाण तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

विशेष ऑडिटमध्ये उघड झाल्या त्रुटी
अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर सुरक्षा निकषांची सखोल तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान विमानांच्या देखभाल, तांत्रिक नोंदी आणि सुरक्षाविषयक प्रक्रियांमध्ये त्रुटी असल्याचे समोर आले. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने DGCAने कठोर भूमिका घेतली.

Learjet विमानांवर बंदी
मिळालेल्या माहितीनुसार, Learjet 40/45 या मॉडेलची चार विमाने उड्डाणासाठी अयोग्य ठरवण्यात आली आहेत. या विमानांचे उत्पादन अमेरिकेत झाले असून ती अनेक वर्षे तेथे वापरली गेल्यानंतर भारतात आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

रोहित पवारांनी उपस्थित केले होते प्रश्न
या प्रकरणात आमदार रोहित पवार यांनी यापूर्वीच विमानांच्या सुरक्षिततेबाबत शंका उपस्थित केले होते. जुनी विमाने भारतात आणून वापरली जात असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला होता. त्यानंतर DGCA कडून ही कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा: Budget Session: रोहित पवारांना सभागृहात अजित पवारांच्या आठवणींनी अश्रू अनावर, म्हणाले… ‘त्यांना सोडणार नाही…’ Video