जेएनएन,मुंबई: महाराष्ट्रात हिवाळ्याचे आगमन होताच राज्यातील प्रदूषणाची स्थिती झपाट्याने बिघडली आहे. ठाणे, नवी मुंबई आणि भिवंडी या महानगर परिसरातील शहरांमध्ये PM2.5 आणि PM10 या धूलकणांचे प्रमाण गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक ठिकाणी प्रदूषण निर्देशांक (AQI) “खराब” ते “अतिखराब” श्रेणीत पोहोचला आहे.

भिवंडी सर्वाधिक प्रदूषित
भिवंडीत PM2.5 चे प्रमाण सरासरी 65–70 µg/m³ दरम्यान नोंदवले गेले. WHO च्या मार्गदर्शक पातळीपेक्षा हे प्रमाण 6 ते 7 पट जास्त आहे. सततच्या औद्योगिक कामकाजामुळे आणि जड वहातुकीमुळे शहरात धूलकणांचे प्रमाण गंभीर स्थितीत पोहोचले आहे.

ठाण्यातही प्रदूषणात वाढ
ठाणे शहरात PM2.5 सुमारे 35–40 µg/m³ आणि PM10 80–85 µg/m³ पर्यंत पोहोचले आहे. वाढत्या वाहनचळवळीमुळे, बांधकाम प्रकल्पांमुळे आणि हवेतील स्थिरतेमुळे ठाण्यात प्रदूषण वाढल्याचे पर्यावरण विभागाचे निरीक्षण आहे.

नवी मुंबईची स्थितीही चिंताजनक
नवी मुंबईतील अनेक भागांत AQI “खराब” श्रेणीत नोंदला गेला आहे. या शहरातील औद्योगिक पट्टा आणि वाहतुकीच्या तीव्र वाढीमुळे हवेतील धूलकणांचे प्रमाण वाढत आहे.

हिवाळ्यासोबत प्रदूषण का वाढते?
हिवाळ्यात तापमान खाली जाताना हवा स्थिर होते आणि वारे मंदावतात. त्यामुळे धूलकण जमिनीच्या जवळच अडकून राहतात. शहरांमधील वाहनांचा धूर, बांधकामातील धूळ, औद्योगिक उत्सर्जन आणि दिवाळीनंतर उरलेले प्रदूषक यामुळे हवेची गुणवत्ता झपाट्याने खालावते.

आरोग्याला मोठा धोका
वाढलेल्या धूलकणांमुळे,दमा आणि श्वसनाचे आजार वाढण्याची शक्यता आहे.हृदयविकारांचा धोका वाढतो.

    लहान मुले, गर्भवती महिला आणि वृद्ध व्यक्तींना विशेष त्रास जाणवतो.

    डोळे, नाक, घसा यांमध्ये खवखव, खोकला, श्वास घेण्यास त्रास अशा तक्रारी वाढतात.

    हेही वाचा: मुंढवा जमीन प्रकरणावरून काँग्रेसने सरकारला घेरलं; वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांना पत्र,चौकशीची केली मागणी