जेएनएन, मुंबई: रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे प्रस्तावित गुजरातच्या टोरेंट कंपनीच्या प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून पर्यावरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी पर्यावरणवादी कार्यकर्ते एकवटले असून, अभिनेते आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सयाजी शिंदे यांनीही या प्रकल्पाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकल्पासाठी एकही झाड तोडू दिले जाणार नाही, असा निर्धार व्यक्त करत त्यांनी स्थानिक नागरिकांना वृक्षतोड रोखण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.
विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जात असतील, तर त्याला विरोध करणे आवश्यक असल्याची भूमिका पर्यावरणप्रेमींकडून मांडली जात आहे. कर्जतमधील प्रस्तावित प्रकल्पामुळे वृक्षतोडीचा मुद्दा चर्चेत आला असून, या प्रकरणात पर्यावरणाचे संरक्षण आणि विकास प्रकल्प यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
सह्याद्रीच्या जैवविविधतेला धोका असल्याची चिंता
सयाजी शिंदे यांनी सह्याद्रीच्या पर्यावरणीय महत्त्वावर भर देत, मोठ्या वृक्षतोडीचा परिणाम केवळ जंगलांवरच नव्हे, तर पशू-पक्ष्यांच्या अधिवासावर आणि स्थानिक पर्यावरणावरही होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली. शंभर ते दीडशे वर्षे जुनी झाडे तोडून विकास साधण्याचा प्रयत्न कशासाठी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
“या प्रकल्पासाठी एकही झाड तोडू देणार नाही,” अशी ठाम भूमिका घेत त्यांनी स्थानिक नागरिकांना वृक्षतोडीविरोधात संघटित होण्याचे आवाहन केले. झाडे तोडण्यासाठी कोणी आले, तर त्यांना कोरोनापेक्षाही भयंकर रोग समजून हातात ताट-वाट्या घेऊन आवाज करत हाकलून लावा, असे आवाहन त्यांनी केले. वृक्षतोड रोखण्यासाठी नागरिकांनी एकजुटीने उभे राहण्याची गरज असल्याचेही आवाहन केले.
३२ हजारांहून अधिक झाडे तोडण्यासंदर्भात परवानगीचा मुद्दा चर्चेत
कर्जत तालुक्यातील सायडोंगर परिसरात टोरेंट पॉवर कंपनीचा ३,००० मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी वनक्षेत्रातील ३२ हजार ४९० झाडे तोडण्याच्या परवानगीचा मुद्दा चर्चेत आला आहे. पर्यावरणवादी संघटना आणि विरोधी पक्षांनी या वृक्षतोडीला विरोध केला आहे. वनक्षेत्रातील सुमारे २३३ हेक्टर जमिनीच्या वापरात बदल होण्याच्या संभाव्य परिणामांबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा: Thane Water Cut: ठाण्यात दोन पाणी कपात: ‘या’ भागात राहणार 24 तास पाणीपुरवठा बंद
