जेएनएन, मुंबई. Rohit Pawar Tweets : दिवंगत अजितदादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असताना, आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर अत्यंत भावुक शब्दांत भावना व्यक्त करत अजितदादांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या या पोस्टमुळे अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले असून, हजारो नागरिकांनी ती शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, “जिथे अजितदादांनी विकासरूपी फुलांची बाग फुलवली, तिथेच त्यांची राख सावडण्याची वेळ येईल, असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते.” अजितदादांच्या दुर्दैवी निधनाची बातमी मिळाल्यापासून मन सुन्न झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. काय, कसे आणि का घडले, या प्रश्नांनी मनात प्रचंड काहूर माजल्याचेही त्यांनी नमूद केले.

अजितदादांची काम करण्याची पद्धत, प्रशासनावरची पकड, राजकारणावरील मजबूत कमांड, परखड स्वभाव आणि वेळेचे काटेकोर नियोजन यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. “बाहेरून कठोर वाटणारे अजितदादा प्रत्यक्षात अत्यंत प्रेमळ आणि आपुलकीने वागणारे होते,” असे सांगत त्यांनी फणसाच्या रूपकातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन केले.

“दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा गाडा हाकणारा, सामान्य माणसासाठी पहाडासारखा उभा राहणारा नेता एका क्षणात आपल्यातून निघून जाईल, हे स्वीकारणं अशक्य आहे,” अशी खंत रोहित पवार यांनी व्यक्त केली. अजितदादांच्या जाण्याने लाखो स्वप्नांची राख झाल्याची भावना व्यक्त करत त्यांनी नियतीलाही प्रश्न केला आहे.

पोस्टच्या शेवटी त्यांनी अजितदादांना उद्देशून भावनिक शब्दांत म्हटले की, “फिनिक्स पक्षाप्रमाणे तुम्ही पुन्हा उभे राहाल आणि आम्हाला कामाला लागण्यास सांगाल, अशी अजूनही मनाची आशा आहे.” “दादा, कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय,” असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. रोहित पवार यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी आणि जनतेचे दुःख पुन्हा एकदा समोर आले आहे.

हेही वाचा: Maharashtra Politics: राजकीय घडामोडींना वेग; सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपद होणार? वरिष्ठ नेत्यांची बंद खोलीत चर्चा

हेही वाचा: Ajit Pawar Plane Crash: बारामती विमान अपघाताचा ब्लॅक बॉक्स सापडला, डेटामध्ये महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता