मुंबई. Maharashtra weather update: बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणाली अधिक सक्रिय झाल्याने देशाच्या पूर्व आणि मध्य भागासह महाराष्ट्रातील हवामानातही मोठा बदल झाला आहे. 24 सप्टेंबरला विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून, काही भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, सध्याच्या अधिकृत माहितीनुसार बंगालच्या उपसागरातील प्रणाली डीप डिप्रेशनमध्ये तीव्र झाली असून उत्तर आंध्र प्रदेश-दक्षिण ओडिशा किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता होती. त्यामुळे ‘अर्नब’ चक्रीवादळाबाबतच्या चर्चेपेक्षा सध्या अधिकृत इशाऱ्यात डीप डिप्रेशनचा उल्लेख महत्त्वाचा आहे.
ओडिशा, छत्तीसगडमध्ये मुसळधार पावसाचा धोका
बंगालच्या उपसागरातील या प्रणालीमुळे ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. २३ सप्टेंबरच्या रात्रीपासून प्रणाली किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. या काळात जोरदार वारे आणि अतिवृष्टीचा धोका असल्याने ओडिशातील प्रशासनानेही खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत.
या प्रणालीचा प्रभाव पुढे मध्य भारताकडे जाण्याची शक्यता असल्याने छत्तीसगडसह मध्य भारतातील काही भागांतही पावसाची सक्रियता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भातही त्याचा परिणाम जाणवू शकतो.
विदर्भात २४24 आणि 25 सप्टेंबर महत्त्वाचे
हवामान विभागाच्या 24 सप्टेंबरच्या इशाऱ्यानुसार विदर्भासाठी ‘व्हेरी हेवी रेन’चा इशारा देण्यात आला आहे. 24 आणि 25 सप्टेंबरला जोरदार पावसाची शक्यता असून २६ सप्टेंबरलाही काही भागांत मुसळधार पाऊस होऊ शकतो. गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ या भागांमध्ये पावसाचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता यापूर्वीही व्यक्त करण्यात आली होती.
याशिवाय मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वारे यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठवाड्यातही पावसाचा जोर
मराठवाड्यात 24 सप्टेंबरला जोरदार पावसासह मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचे वारे यांचा इशारा आहे. 25 आणि 26 सप्टेंबरलाही वादळी पावसाची शक्यता कायम राहणार आहे.
लातूर, धाराशिव, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये पावसाच्या सरींसह काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसाचा खंड पडलेल्या भागांसाठी हा पाऊस महत्त्वाचा ठरू शकतो. मात्र काढणीला आलेल्या पिकांसाठी सलग पाऊस अडचणीचा ठरू शकतो.
मध्य महाराष्ट्रातही वादळी पावसाची शक्यता
मध्य महाराष्ट्रातही 24 ते 26 सप्टेंबरदरम्यान मेघगर्जना आणि विजांसह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने या काळात जोरदार पृष्ठभागीय वाऱ्याचाही इशारा दिला आहे.
