मुंबई. दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत तसेच शरद पवार एनडीएसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या पराश्वभूमीवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सोबत जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिले आहेत. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चांनाही त्यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले.
दिल्लीतील जंतर-मंतरवर विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी आणि प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली होती. या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण -
अलीकडेच दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे नेते प्रफुल पटेल आणि पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग आला. मात्र, या सर्व चर्चांवर रोहित पवार यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, पक्षाच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. शरद पवार हे एनडीएमध्ये जाणार नाहीत आणि दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत सध्या कोणतीही प्रक्रिया सुरू नाही.
“भेटींचा राजकीय अर्थ काढू नका”
रोहित पवार यांनी सांगितले की, सार्वजनिक जीवनात विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये भेटीगाठी होत असतात. अशा प्रत्येक भेटीचा राजकीय निर्णयाशी संबंध जोडणे योग्य नाही. शरद पवार यांची पंतप्रधानांसोबतची भेट ही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत होती, तर इतर नेत्यांच्या भेटींवरून विलिनीकरणाचा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल.
राजकीय चर्चांना पूर्णविराम?
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे बोलले जात होते. मात्र, रोहित पवार यांच्या ताज्या स्पष्टीकरणामुळे या चर्चांना तात्पुरता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्ष स्वतंत्र भूमिका कायम ठेवणार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
