मुंबई. मराठवाड्यात पावसाने दिलेल्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप हंगाम संकटात सापडला असून, विभागात सरासरीच्या तुलनेत तब्बल 35 टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. सर्वाधिक गंभीर परिस्थिती लातूर जिल्ह्यात असून येथे पावसाची तूट सुमारे 50 टक्के आहे. त्यापाठोपाठ परभणीमध्ये 43 टक्के, तर धाराशिव आणि बीडमध्ये प्रत्येकी 40 टक्के पावसाची तूट आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांतही सुमारे 26 टक्के तूट कायम आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यातील जाऊ आणि खरोसा परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. पावसाअभावी सोयाबीनसह खरीप पिकांची झालेली अवस्था त्यांनी प्रत्यक्ष पाहिली. यावेळी शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान, पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि आगामी रब्बी हंगामाबाबतच्या अडचणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. काही शेतकरी भावनिक झाले असताना फडणवीस यांनी त्यांना धीर देत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. 

लातूरमध्ये परिस्थिती सर्वाधिक गंभीर

लातूर जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे. जिल्ह्यात सुमारे 50 टक्केच पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सोयाबीन, तूर, मूग, उडीद यांसह खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. काही भागांत दीड महिन्याहून अधिक काळ समाधानकारक पाऊस न झाल्याने पिके वाळून गेली आहेत. अलीकडे काही ठिकाणी पाऊस झाला असला तरी अनेक शेतकऱ्यांच्या हातातून खरीप हंगाम निघून गेल्याचे चित्र आहे.

धाराशिव, बीड, परभणीतही पावसाची मोठी तूट

मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांची परिस्थितीही चिंताजनक आहे. धाराशिव आणि बीडमध्ये पावसाची तूट प्रत्येकी 40 टक्के असून, परभणीमध्ये 43 टक्के तूट नोंदवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना या तुलनेने चांगल्या पावसाच्या जिल्ह्यांमध्येही सुमारे 26 टक्के तूट असल्याची माहिती विभागीय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

    246 टँकर सुरू; धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव

    पावसाअभावी मराठवाड्यात पाणीटंचाईचा प्रश्नही गंभीर झाला आहे. विभागात सध्या 246 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये बीडमध्ये 120, छत्रपती संभाजीनगरमध्ये 96 आणि जालन्यात 22 टँकर सुरू आहेत. प्रशासनाने उपलब्ध धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

    मराठवाड्यातील 917 मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्प तसेच नदीवरील बंधाऱ्यांमध्ये अपेक्षित पाणीसाठ्याच्या तुलनेत सुमारे 50 टक्के तूट असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. जायकवाडीमध्ये काही प्रमाणात पाणीसाठा असला तरी मांजरा धरणातील साठा अत्यल्प असल्याने लातूर आणि आसपासच्या भागातील पाणीप्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.

    उद्या दुष्काळाबाबत शासन निर्णयाची शक्यता?

    दरम्यान, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून उद्या दुष्काळाबाबत शासन निर्णय काढण्याची शक्यता आहे. 

    पंचनामे कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून केले जात असले तरी शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही.सरसकट मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे फडणवीस स्पष्ट केले आहे. खरीपाबरोबरच आगामी रब्बी हंगामाचा विचार करून उपाययोजना करण्याचेही संकेत त्यांनी दिले आहे. 

    प्रशासनाकडून प्राथमिक अहवाल तयार

    पावसाची तूट आणि पिकांची स्थिती लक्षात घेऊन महसूल, कृषी आणि स्थानिक प्रशासनाला प्रत्यक्ष शेतपातळीवर पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. आज शासनाकडे प्राथमिक अहवाल पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे.