मुंबई. Maharashtra Foundation Day 2026: राज्यात आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राज्यभर शासकीय तसेच विविध सामाजिक संस्थांच्या वतीने ध्वजारोहण, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शासकीय इमारतींवर रोषणाई करण्यात आली असून ठिकठिकाणी देशभक्तीपर कार्यक्रम सादर करण्यात येत आहेत. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील हुतात्मा चौक येथे हुतात्म्यांना अभिवादन करून राज्यातील नागरिकांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिले. राज्याच्या निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृतींना यावेळी मानवंदना दिली. महाराष्ट्राच्या प्रगतीत कामगारांचे योगदान महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार  तसेच राज्यातील सर्व मंत्री आणि पालकमंत्र्यांनी आपल्या-आपल्या जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहण करून कार्यक्रमात सहभाग घेतला. विविध जिल्ह्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुका आणि सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले.

दरम्यान, 1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन असल्याने कामगार संघटनांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कामगारांच्या हक्कांविषयी जनजागृती करण्यासाठी रॅली, चर्चासत्रे आणि सन्मान सोहळे पार पडत आहेत.

महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असून सरकारी कार्यालये, बँका आणि शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त राज्यभर उत्साह, अभिमान आणि एकात्मतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.