कोल्हापूर - गेल्या 12 दिवसापासून सुरू असलेल्या गणेश उत्सवाची आज अनंतचतुर्थीदिवशी सांगता होत आहे. आज राज्यभरात जड अंतःकरणाने गणरायाला निरोप दिला जात असतानाच कोल्हापुरातून एक दुर्दैवी घटना घडली आहे. विसर्जन मिरवणूक सुरू असतानाच वाय. पी. पोवार नगर मंडळाची 21 फुटी गणेशमूर्ती शुक्रवारी सकाळी सव्वादहा वाजता गोखले कॉलेज चौकात अचानक कोसळली. मूर्तीला मार्गावरील विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार वाय. पी. पोवार नगर येथून गणेशमूर्ती ट्रॅक्टर ट्रॉलीतून विसर्जनासाठी नेण्यात येत होती. मूर्ती एका पायावर असून झुकलेल्या अवस्थेत होती. गोखले कॉलेज चौकात आल्यानंतर विद्युत तारेचा स्पर्श होताच काही क्षणांत मूर्ती रस्त्यावर कोसळली. मूर्ती कोसळताच विसर्जन मिरवणुकीत एकच गोंधळ उडाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवत तात्काळ मदतकार्य सुरू करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
या दुर्घटनेनंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी क्रेनच्या सहाय्याने मूर्ती रस्त्याच्या बाजूला केली. विसर्जन मार्गावरील विद्युत तारा तसेच झाडांच्या फांद्या हटविण्याबाबत महावितरणकडे मंडळाने विनंती केली होती. मात्र, त्याची पूर्तता न झाल्याने दुर्घटना घडल्याचा आरोप मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला.
महावितरणकडून खुलासा -
21 फुटी बॅलेंसिंग गणेशमूर्ती कोसळल्याच्या घटनेनंतर महावितरणने खुलासा केला आहे. या दुर्घटनेत महावितरणचा कोणताही निष्काळजीपणा नसल्याचे महावितरणचे कोल्हापूर जनसंपर्क अधिकारी विश्वजित भोसले यांनी स्पष्ट केले आहे.
त्यांनी सांगितले की, मिरवणुकीपूर्वी मुख्य मिरवणूक मार्गावरील महावितरणशी संबंधित सर्व आवश्यक कामे, तसेच पोलिस प्रशासनाने सूचित केलेली कामे आणि आवश्यक दुरुस्त्या पूर्ण करण्यात आल्याचे महावितरणने म्हटले आहे.
