कोल्हापूर. Gokul Milk Price Hike: अमूल आणि मदर डेअरीनंतर आता महाराष्ट्रातील प्रमुख दूध उत्पादक संघांपैकी एक असलेल्या गोकुळ दूध संघाच्या दूध दरातही वाढ होण्याची शक्यता आहे. गोकुळचे नूतन अध्यक्ष राजेश पाटील यांनी दूध दरवाढीचे संकेत दिले आहेत. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची पहिली बैठक होणार असून, या बैठकीत दूध खरेदी आणि विक्री दरवाढीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला आणखी झळ बसण्याची चिन्हे आहेत.
गोकुळला 24 कोटींचा तोटा; दरवाढीची गरज
गोकुळ दूध संघाला मागील सहा महिन्यांच्या प्रशासकीय कारभाराच्या काळात सुमारे 24 कोटी रुपयांचा तोटा झाल्याची माहिती नूतन अध्यक्ष राजेश पाटील यांनी दिली आहे. हा तोटा भरून काढणे आणि दूध संघाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याला नव्या संचालक मंडळाचे प्राधान्य आहे.
या पार्श्वभूमीवर दूध विक्रीच्या दरात वाढ करणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. बाजारातील इतर दूध उत्पादक कंपन्यांनीही दरवाढ केली आहे. त्यामुळे गोकुळच्या दूध दराचाही फेरविचार करावा लागणार असल्याचे त्यांनी सूचित केले.
प्रतिलिटर किती रुपयांनी दर वाढणार?
गोकुळच्या गाईच्या आणि म्हशीच्या दूध खरेदी तसेच विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ करण्याचा प्रस्ताव चर्चेत येण्याची शक्यता आहे. मात्र, दरवाढीचा अंतिम आकडा अद्याप निश्चित झालेला नाही. याबाबतचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला जाणार आहे.
दरवाढ करताना ग्राहकांवर मोठा आर्थिक भार पडणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे राजेश पाटील यांनी म्हटले आहे. मोठ्या प्रमाणात दरवाढ करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने आर्थिक गणित जुळवण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.
दरम्यान, दूध विक्री दरात वाढ झाल्यास दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या खरेदी दरातही वाढ करता येणार आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना अधिक मोबदला देण्याच्या दृष्टीनेही या निर्णयाकडे पाहिले जात आहे.
अमूल आणि मदर डेअरीनंतर गोकुळचा निर्णय?
देशातील प्रमुख दूध उत्पादक कंपन्यांनी अलीकडेच दूध दरात वाढ केली आहे. अमूलने 12 नोव्हेंबरपासून आपल्या विविध प्रकारच्या पॅकबंद दुधाच्या दरात चार ते पाच टक्क्यांनी वाढ केली आहे. तर मदर डेअरीने दिल्ली-एनसीआर परिसरात दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन ते चार रुपयांनी वाढ केली आहे.
दूध संकलन, पशुखाद्य, वाहतूक, पॅकेजिंग आणि प्रक्रिया यांसारख्या खर्चात वाढ होत असल्याने दूध उत्पादक कंपन्यांकडून दरवाढीचा निर्णय घेतला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता गोकुळ दूध संघाकडूनही दरवाढीचा विचार सुरू आहे.
