जेएनएन, मुंबई. देशातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असली, तरी महाराष्ट्रातील पावसाचा जोर अद्याप पूर्णपणे ओसरलेला नाही. उलट, परतीचा पाऊस राज्यातील काही भागांना पुन्हा झोडपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे.

सातारा, सांगलीत जोरदार पावसाची शक्यता 

मध्य महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याचा घाटमाथा आणि सांगली जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असून, या भागांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. सातारा परिसरात आज दुपारनंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस अथवा मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

राज्यातील उर्वरित भागांतही वातावरण अस्थिर राहण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी, प्रवासी आणि घाट परिसरातून प्रवास करणाऱ्यांनी हवामानाच्या माहितीकडे लक्ष ठेवण्याची गरज आहे. 

परतीच्या मान्सूनची सीमा पश्चिम राजस्थानात 

भारतीय हवामान विभागाने देशातून नैऋत्य मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या परतीच्या मान्सूनची सीमा पश्चिम राजस्थानाच्या काही भागांत कायम आहे. येत्या दोन दिवसांत आणखी काही भागांतून मान्सूनच्या माघारीसाठी पोषक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, मान्सून माघारीला सुरुवात झाली असली तरी देशातील अनेक भागांत पावसाची सक्रियता कायम आहे.  

    अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती 

    दरम्यान, ईशान्य अरबी समुद्रात समुद्रसपाटीपासून सुमारे 3.1 ते 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या वातावरणामुळे महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टीवरील काही भागांमध्ये स्थानिक पावसाच्या हालचालींना चालना मिळण्याची शक्यता आहे.

    त्याचवेळी बंगालच्या उपसागरातील घडामोडींवरही हवामान विभागाचे लक्ष आहे.

    बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

    उत्तर अंदमान समुद्र आणि लगतच्या पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ही प्रणाली वायव्य दिशेने पुढे सरकण्याची शक्यता असून, पुढील काळात तिची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत. ही प्रणाली बुधवारपर्यंत ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे पोहोचण्याची शक्यता आहे. 

    IMDच्या माहितीनुसार, या प्रणालीमुळे पूर्व भारतातील काही भागांत पुढील दिवसांत पावसाचा जोर वाढू शकतो. दक्षिण ओडिशा आणि उत्तर किनारी आंध्र प्रदेशात 23 आणि 24 सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून नमूद करण्यात आले आहे.

    पुढील काही दिवस पावसाची शक्यता कायम 

    त्यामुळे एकीकडे देशात मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला असला, तरी दुसरीकडे निर्माण झालेल्या विविध हवामान प्रणालींमुळे पावसाचा खेळ अजून काही दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही स्थानिक वातावरण, चक्राकार वाऱ्यांची स्थिती आणि बंगालच्या उपसागरातील प्रणाली यांचा परिणाम पाहायला मिळू शकतो. 

    राज्यात सध्या अनेक भागांत पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांवर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत पुढील पाऊस शेतीसाठी काही भागांत दिलासा देणारा ठरू शकतो. मात्र विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.