एजन्सी, लातूर: लातूर जिल्ह्यातील बोरवती गावात शुक्रवारी सकाळी 6:30 वाजता 2.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला, परंतु यामध्ये कोणालाही दुखापत किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
नवी दिल्ली येथील राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने या घटनेची पुष्टी केली आहे आणि त्याला "अत्यंत सौम्य तीव्रतेचा" भूकंप म्हटले आहे, असेही त्यांनी सांगितले.
"भीतीचे कोणतेही कारण नाही. असे कमी तीव्रतेचे भूकंप सामान्य असतात आणि सामान्यतः निरुपद्रवी असतात,” असे अधिकाऱ्याने सांगितले.

यापूर्वीही जाणवला होता भूकंपाचा धक्का
दरम्यान, लातूर जिल्ह्यात मंगळवारी रात्रीच्या सुमारास 2.3 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला होता. या भूकंपात कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. मुरुड अकोला गावात रात्री 8:13 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले आणि त्याचे केंद्र लातूर शहराच्या पश्चिमेस 5 किलोमीटर खोलीवर होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले होते.