संभाजीनगर l मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. हातातलं पीक वाहून गेलं, जमिनी खरवडून निघाल्या आणि शेतकऱ्यांपुढे जगण्यासाठीही संकट उभं राहिलं आहे. अशा गंभीर स्थितीत सरकारकडून मिळणारी मदत “तुटपुंजी आणि अपमानास्पद” असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल -

विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले की, सरकारला आधीच पत्र लिहून ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी आम्ही केली आहे. मात्र सरकारने आतापर्यंत कोणतीच घोषणा केलेली नाही. 

मदतीच्या नावाखाली एखादा तुकडा फेकू नका -

काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी आरोप केला की, शेतकऱ्यांना मदत करायची वेळ आली की सरकारच्या तिजोरीत खडखडाट सुरू होतो. पण नको असलेल्या शक्तिपीठांसाठी आणि स्वतःच्या जाहिरातींसाठी मात्र कोट्यवधी रुपये खर्च करायला पैसे सरकारला लगेच मिळतात.

केंद्राकडे प्रस्ताव पाठवून जास्तीचा निधी घेऊन यावा आणि शेतकऱ्यांना निकषांपलीकडे जाऊन मदत द्यावी, अशी मागणी वड्डेटीवार यांनी केली आहे.

    मदतीच्या नावाखाली एखादा तुकडा फेकून शेतकऱ्यांचा अपमान करू नका, असा इशाराही विरोधकांनी दिला आहे.