जेएनएन, हिंगोली. Ladki Bahin Yojana News : जिल्ह्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नसल्याने संतप्त महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर  धडक मोर्चा  काढला. निवडणुकीपूर्वी या योजनेत कोणतेही निकष नसताना, आता अचानक निकष लावून पैसे बंद करण्यात आले आहेत. सरकारने योजनेचा लाभ बंद केल्याने घरा घरात भांडणे लावले असल्याचा आरोपही संतप्त महिलांनी केला आहे.

निवडणुकीपूर्वी लाभ, निवडणुकीनंतर बंद!

संतप्त महिलांनी आरोप केला की, विधानसभा निवडणुकीपूर्वी कोणतीही कागदपत्रे वा अटी न घालता सर्व पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जात होते. मात्र निवडणूक संपताच निकष लावले गेले आणि अनेकांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आले. निवडणुकीपूर्वी आम्ही सर्व लाडक्या बहिणी होतो, पण आता आम्ही सावत्र बहिणी झालो का? असा सवाल संतप्त महिलांनी सरकारला विचारला आहे.

महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - 

तपोवन गावासह हिंगोली तालुक्यातील अनेक गावांतील महिला जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्या. महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांनी आपल्या तक्रारी मांडल्या. महिलांनी सरकारवर घराघरात वाद लावल्याचा आरोप केला.आमच्या घरात भांडणं लावली गेली आहेत. निवडणुकीपूर्वी पैसे दिले, पण आता अचानक बंद केले. सरकारनेच आमच्या पोटावर लाथ मारली आहे, असा रोष महिलांनी व्यक्त केला.

‘लाडकी’ की ‘सावत्र’?

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारमधील स्थानिक आमदार-खासदार यांना महिलांनी जाब विचारला आहे.आम्ही मतदान करण्यापूर्वी लाडक्या होतो, पण आता सावत्र का ठरलो? निवडणुकीनंतर योजनेच्या अटी-शर्ती बदलल्या कशा? आणि ज्या महिलांना खरोखरच पैशांची गरज आहे त्यांना वंचित का ठेवलं जात आहे, असा प्रश्न ही महिलांनी विचारला आहे.