जेएनएन, बीड. Beed Latest News: मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचा हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक आणि राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करणारे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांच्यासोबत घातपात होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्याच पार्श्वभूमीवर रणजीत कासले यांना छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात हलविण्यात आले आहे. कासले यांची रवानगी हर्सुल जेलमध्ये सुरक्षा कारणामुळे करण्यात आली असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे.

रणजीत कासलेंचे वाल्मीक कराडवर गंभीर आरोप 

सध्या वाल्मिक कराड बीड जिल्ह्याच्या जेलमध्ये बंद आहे. कराड याची नुकतीच तब्येत बिघडल्याने वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिकी कराडसोबत सुदर्शन घुले आणि इतर आरोपी बीड कारागृहात आहेत. याच दरम्यान रणजीत कासलेंनी वाल्मीक कराड याच्यावर गंभीर आरोप केले होते.

कासले विरोधात तीन गुन्हे

ॲट्रॉसिटी प्रकरणात सध्या रणजीत कासले न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने त्याची रवानगी हर्सुल कारागृहात करण्यात आली. कासले विरोधात बीड जिल्ह्यात तीन गुन्हे दाखल आहेत. शिवाजीनगर पोलीस ठाणे, अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे आणि परळी पोलीस ठाण्यात कासले विरोधात गुन्हे दाखल आहेत. वाल्मिकी कराड याचा मुक्काम सध्या जेलमध्ये आहे. बीड जिल्हा न्यायालयाने संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिकी कराडला न्यायलयीन कोठडी सुनावली आहे.