जेएनएन, छत्रपती संभाजीनगर. MNS On Aurangzeb Tomb Row: राज्यात मागील काही दिवसांपासून औंरगजेबाच्या कबरीवरून वादंग सुरु आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी छत्रपती संभाजी नगर येथील खुलताबादेतील कबर उखडून टाकण्याची भूमिका घेतली आहे. तर राज ठाकरे यांच्या मनसेनं औंरगजेबाची कबर उखडण्याची गजर नसून ते शिवाजी महाराजांचे शौर्याचं प्रतिक असल्याचं म्हटलं आहे.
यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज छत्रपती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी पक्षाच्या वतीने प्रमुख पाच मागण्या करण्यात आल्या आहेत.
मनसेनं केलेल्या पाच मागण्या -
- औरंगजेबाच्या कबरीजवळीत जर सजावट असेल तर ती त्वरित काढली जावी.
- यापुढे त्या कबरीवर कुठलाही सरकारी खर्च करण्यात येऊ नये जर खर्च करण्यात येणार असेल तर तो उधळून लावण्यात येईल.
- सर्व शाळेतील मुलांच्या शैक्षणिक सहली तिथे काढण्याचा सरकारी आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने काढण्यात यावा, जेणेकरून लहान मुलांना आणि जगाला आपला इतिहास कळेल.
- त्या कबरीजवळ "आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला" असा उल्लेख असलेला एक बोर्ड लावण्यात यावा.
- या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे जेणे करून जो कुणी त्या कबरीवर फुल चादर चढवण्यास येईल त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येईल.
अशी पाच मागण्या मनसे शिष्टमंडळाच्या वतीनं करण्यात आल्या आहेत.
यावेळी प्रशांत जोशी, अभय देशपांडे, प्रतीक गायकवाड पाटील, आकाश जाधव पाटील, अमित सिंग ठाकूर, मकरंद पुराणिक, विक्रम सिंग परदेशी, अमित भांगे, मनोज भिंगारे, चंदू नवपुते, हेमंत जाधव, प्रकाश जाधव, मोहित प्रभाकर, विशाल टिंगरे यांच्यासह मोठ्या संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.