जेएनएन, मुंबई: राज्यातील 29 महापालिकांसाठी निवडणुकांची घोषणा होताच राजकीय वातावरण तापू लागले आहे. देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, येत्या काही आठवड्यांत मुंबईतील राजकारण अधिकच रंगणार असल्याचं चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर, मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुती म्हणून एकत्र लढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तर दुसरीकडे, मुंबई महापालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरती मर्यादित न राहता, प्रतिष्ठेची आणि ताकद आजमावणारी ठरणार आहे. 

पुढील आठवडाभरात उमेदवारांच्या नावांची यादी निश्चित करायची असल्याने सर्वच पक्षांमध्ये वेगवान हालचाली सुरू आहेत. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती, मतदारसंघनिहाय आढावे, तसेच संभाव्य उमेदवारांच्या नावांवर वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचं समजते.

आदित्य ठाकरे यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी

दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकांसाठी आदित्य ठाकरे यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. निवडणूक प्रचाराची संपूर्ण धुरा आदित्य ठाकरे सांभाळणार असून, प्रचार नियोजन, विविध मेळावे, सभा आणि संवाद कार्यक्रमांची आखणी त्यांच्याकडून केली जाणार आहे. विशेषतः मुंबईतील युवा मतदारांवर लक्ष केंद्रित करत, त्यांच्या प्रश्नांना, अपेक्षांना आणि शहराशी संबंधित मुद्द्यांना प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवण्यावर भर दिला जाणार आहे.

आधुनिक प्रचार पद्धतींच्या माध्यमातून तरुण मतदारांवर भर

    युवा रोजगार, शिक्षण, पर्यावरण, सार्वजनिक वाहतूक, घरांची समस्या, आरोग्य आणि डिजिटल सुविधा अशा विषयांवर आधारित प्रचार रणनीती आखण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. सोशल मीडियाचा प्रभावी वापर, थेट संवाद आणि आधुनिक प्रचार पद्धतींच्या माध्यमातून तरुण मतदारांना शिवसेनेकडे वळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

    एकीकडे महायुतीची ताकद आणि दुसरीकडे ठाकरे बंधूंचं एकत्र येणं, यामुळे मुंबई महापालिका निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची लक्षणे दिसत आहेत. आगामी काही दिवसांत उमेदवारांची घोषणा आणि प्रचाराचा जोर वाढल्यानंतर मुंबईतील राजकीय चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.