जेएनएन, नवी दिल्ली. हिंगोली आणि परभणी जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन झाले आहे. आज पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास त्यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते 72 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

धनगर समाजाचा बुलंद आवाज हरपला

खासदार रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाचा बुलंद आवाज हरपला असून, मराठवाड्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 

खासदार रामराव वडकुते यांच्या बद्दल

  • मूळचे हिंगोली जिल्ह्यातील बाभूळगाव येथील रहिवासी असलेले वडकुते यांचा जन्म 1954 मध्ये वाशीम जिल्ह्यातील आजोळ वारला येथे झाला. 
  • बीएस्सी पदवी घेतल्यानंतर त्यांनी काही काळ वीज वितरण कंपनीत नोकरी केली. 
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून राजकीय कारकीर्द सुरू करताना त्यांनी 2001 ते 2004 आणि 2012 ते 2014 या काळात शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्षपद भूषविले.
  • 2014 मध्ये त्यांची विधान परिषदेवर निवड झाली. 
  • त्यानंतर 2019 मध्ये भाजपात प्रवेश करून त्यांनी राज्यभर पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी काम केले. 
  • एप्रिल 2026 मध्ये भाजपाने त्यांना राज्यसभेवर संधी दिली होती. 

मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी वाहिली श्रद्धांजली

संसदेतील आमचे सहकारी, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने सार्वजनिक जीवनातील एक अनुभवी आणि समर्पित नेतृत्व हरपले आहे. वडकुते कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ईश्वर दिवंगत आत्म्यास सद्गती देवो आणि शोकाकुल कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना, अशा शब्दात मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. 

    हेही वाचा - Accident News: खाटू श्यामचे दर्शन घेऊन परताना क्रूझरचा भीषण अपघात, महाराष्ट्रातील एकाच कुटूंबातील 9 जणांचा मृत्यू