नाशिक - नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या (Ashok Kharat) एक-एक कारनाम्याने समाजमन ढवळून निघाले आहे. धार्मिक विधी, तंत्र-मंत्र व भविष्य सांगण्याच्या बहाण्याने अनेक महिलांची फसवणूक व त्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात याच्याविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. एका महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, तुझा घटस्फोट विधिलिखित आहे, तू मागील जन्मातील अप्सरा आहेस, तर मी कृष्णाचा अवतार” अशा बाता मारत त्याने महिलेवर बलात्कार केला.
मिळालेल्या माहितीनुसार, 33 वर्षीय पीडित महिला विवाहीत होती, मात्र कौंटुबिक वाद व पतीसोबतच्या भांडणाला वैतागून ती यावर उपाय शोधण्यासाठी खरातकडे गेली. पीडितेच्या परिस्थितीचा खरातने गैरफायदा घेत तिला सांगितले की, तुझा घटस्फोट विधीलिखित आहे, या नवऱ्यासोबत तुला सुख लागणार नाही, “मी अवतारी पुरुष आहे, तू गेल्या जन्मीची अप्सरा आहेस, मला त्रिकाळ ज्ञान आहे”, असं म्हणत तिला आपल्या जाळ्यात ओढलं व तिचे शोषण सुरू केले.
विशेष म्हणजे या शोषणाच्या काळात पीडित महिला गर्भवती राहिली. त्यानंतर त्याने तिला आपल्या कार्यालयात बोलावून गर्भपात करण्याची औषधे दिली. तसेच “माझ्या नशिबात दोन विवाह करण्याचा योग आहे, तू माझ्याशी लग्न कर, मी तुला व तुझ्या मुलांना चांगल्या प्रकारे सांभाळेल, असे सांगत लग्नाचे आमिष दाखवून तो महिलेला फसवत राहिला.
मुलाचे बरे वाईट होईल -
तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी मी सांगतो ते कर. नाहीतर तुझा कोप होईल आणि तुझ्या मुलांचं देखील बरं वाईट होईल, असे भीती घालत भोंदूबाबा अशोक खरातने पीडित महिलेला धमकी दिल्याचे देखील तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणामुळे नाशिकमध्ये संतापाची लाट उसळली असून, भोंदूबाबांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
