अहिल्यानगर. Ashok Kharat Case: भोंदू अशोक खरात प्रकरणात नवीन घडामोड समोर आली आहे. सहाव्या गुन्ह्यात न्यायालयाने खरातला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 26 तारखेपर्यंत खरात पोलिसांच्या ताब्यात राहणार असून या काळात विशेष तपास पथक (SIT) सखोल चौकशी करणार आहे.
या सहाव्या गुन्ह्यात खरातवर गंभीर स्वरूपाचे आरोप ठेवण्यात आले आहेत. विधी, पूजा आणि अघोरी उपचारांच्या नावाखाली महिलांची फसवणूक करत त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच पाण्यात गुंगीचे औषध मिसळून देणे, खाण्यातूनही औषध देऊन बेशुद्ध करण्याचे प्रकार केल्याची तक्रार पीडितांकडून करण्यात आली आहे.
यासोबतच, धार्मिक विधींच्या बहाण्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याचाही आरोप तपासात पुढे आला आहे. पीडितांकडून लाखो रुपयांची उकळपट्टी करण्यात आल्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणात SITने न्यायालयाकडे चार दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. गुंगीची औषधे कुठून आणली, आर्थिक व्यवहारांची साखळी, तसेच इतर संभाव्य पीडितांचा शोध घेण्यासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र न्यायालयाने तीन दिवसांचीच कोठडी मंजूर केली.
दरम्यान, खरातविरुद्ध आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल झाले असून तपासाचा विस्तार होत चालला आहे. पोलिसांकडून त्याच्या संपर्कातील व्यक्ती, आर्थिक व्यवहार आणि विविध ठिकाणांवरील हालचालींचा तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
