नाशिक. Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरातच्या एसआयची चौकशीला वेग आला असून तपासाचा आज 12 वा दिवस आहे. रविवारी केलेल्या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. खेड्यातील एक सामान्य मुलगा ते कोट्यवधीची माया कशी जमवली, याचा पोलीस शोध घेत आहेत. अशोक खरातची पोलीस कोठडीची मुदत काल संपल्यानंतर त्याला पुन्हा कोर्टात हजर केले असता त्याची पोलीश कोठडी 1 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे.

मोबाईलमधील अडीच हजार नंबर कोडवर्डमध्ये सेव्ह -

 सरकारी वकिलांनी सांगितले की, अशोक खरातच्या मोबाईलमधील डाटाचे विश्लेषण केले जाणार असून त्याने सेव्ह केलेल्या टोपण नावांची उकल करण्यासाठी अशोक खरातची उपस्थिती आवश्यक आहे, त्यामुळे त्याच्या पोलीस कोठडीची मुदत वाढवली जावी. अशोक खरातचा लॅपटॉप, मोबाइलसह विविध कागदपत्रेही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अशोक खरातच्या या मोबाइलमधून अनेक धागेदोरे समोर येत आहेत. अशोक खरातच्या मोबाइलमध्ये अडीच हजारांहून अधिक नंबर कोडवर्डमध्ये सेव्ह असल्याने या प्रकरणाचा तपास अधिक गूढ बनला आहे.

डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू -

अशोक खरातकडून दोन मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. त्यातील डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू आहे. मोबाइलमध्ये हायप्रोफाईल व्यक्तींची नावे कोडवर्डमध्ये  'डमी' स्वरूपात सेव्ह केल्याचा संशय आहे. त्याचबरोबरपीडित महिलांशी संपर्क करण्यासाठी अशोक खरात जो मोबाईल वापरायचा तो अद्याप पोलिसांना सापडलेला नाही, अशी माहितीही समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे. 

न्यायालयाने अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. आता 1 एप्रिलपर्यंत खरात पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे. महिलांवरील अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या या गंभीर प्रकरणात पोलीस तपासात अद्याप अनेक गोष्टी स्पष्ट व्हायच्या आहेत. तपासाची व्याप्ती मोठी असून नवनवीन पीडित महिला समोर येत असल्याने, या वाढीव कोठडीत अशोक खरातच्या गुन्हेगारी साम्राज्याचे आणखी कोणते धागेदोरे हाती लागतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

    अशोक खरातची पोलीस कोठडी का वाढवली? 

    अशोक खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू आहे. हे त्याच्या समक्षच केले जाणे आवश्यक आहे. त्याचबरोबर हा भोंदू महिलांचे लैंगिक शोषण करण्यापूर्वी महिलांना खाण्यासाठी पेढे, पिण्यासाठी खारट कडवट पाणी देत होता. ते प्यायल्यानंतर महिलांचे डोके जड व्हायचे व गरगरल्याखारखे व्हायचे. त्यानंतर या महिला तो सांगेल तसे करायच्या. त्यामुळे या पेढ्यात व पाण्यात नेमकं काय टाकायचा याचा तपास करायचा असल्याने त्याच्या पोलीस कोठडीची मुदत वाढवली आहे.