जेएनएन, सांगली: सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर परिसरात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर गुंगीचे औषध देऊन सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी ईश्वरपूर पोलिसांनी दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. दुसरा संशयित आरोपी फरार असून, त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

शीतपेयातून दिलं गुंगीचे औषध 

माहितीनुसार, पीडित तरुणीला आरोपींनी ईश्वरपूरमधील कामेरी रस्त्यावरील एका लॉजमध्ये नेल्याचा आरोप आहे. तेथे शीतपेयातून तिला गुंगीचे औषध देण्यात आले. त्यानंतर तिच्यावर दोन्ही आरोपींनी अत्याचार केल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे. या घटनेनंतर तरुणीला आरोपींकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचाही आरोप आहे. 

एकाला घेतलं ताब्यात

घटनेनंतर पीडित तरुणीने पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर संपूर्ण प्रकार समोर आला. तिच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोन संशयितांविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत एका संशयिताला ताब्यात घेत अटक केली आहे. तर दुसरा आरोपी फरार असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत. 

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु

    दरम्यान, पोलिसांकडून घटनेशी संबंधित ठिकाणांची पाहणी, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तपासले जात आहेत. पीडित तरुणीला नेमके कशाप्रकारे गुंगीचे औषध देण्यात आले, घटनेपूर्वी आरोपी आणि तरुणीमध्ये काय संपर्क होता आणि या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, या सर्व बाबींचा तपास केला जात आहे.