कोल्हापूर. कानात इअरफोन घालून रेल्वेरुळावरून चालणे एका तरुणीच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे घडली आहे. मागून येणाऱ्या धनबाद एक्स्प्रेसच्या धडकेत तरुणी जागीच ठार झाली. अनुष्का संतोष पोवार (वय 17, रा. वेताळ पेठ, इचलकरंजी) असे मृत्यू झालेल्या तरुणीने नाव आहे.
ही घटना बुधवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहासमोरील रेल्वेरुळावर घडली. रेल्वेच्या धडकेत तरुणीचा मृतदेह ३० फूट हवेत उडाला. आपल्या डोळ्यादेखत मैत्रिणीच्या अंगाचा चेंदामेंदा झाल्याचे पाहून व रक्ताचा सडा अंगावर पडल्याने तिच्या दोन मैत्रिणी जागीच बेशुद्ध होऊन पडल्या. त्या शुध्दीवर आल्यानंतर या अपघाताचे गुढ उकलले. या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अनुष्का आपल्या दोन मैत्रिणींसह रेल्वे रुळावरून चालत जात होती. तिच्या मैत्रिणी काही अंतर मागे चालत होत्या. कानात इअरफोन असल्याने तिला मागून येणाऱ्या धनबाद एक्स्प्रेसच्या हॉर्नचा अंदाज आला नाही. सोबत असलेल्या मैत्रिणींनी तिला वाचवण्यासाठी आरडाओरडा करत धाव घेतली. मात्र, त्या तिच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच भरधाव रेल्वेने अनुष्काला धडक दिली.
अनुष्काच्या दोन्ही कानांत ब्लूटूथ इअरबड्स असल्याने तिला मैत्रिणी ओरडण्याचा आणि रेल्वे ट्रॅकवरून येणाऱ्या रेल्वेचा आवाज आला नसावा, असा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण रुग्णालयातील जीवरक्षक स्वप्निल नरुटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची नोंद हातकणंगले पोलिसांत झाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. इअरफोन वापरण्याच्या निष्काळजीपणामुळे तरुणीच्या झालेल्या मृत्यूबाबत परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
रेल्वे पोलीस आणि हातकणंगले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुष्का कोरोची येथील आरोग्य परिचरचे शिक्षण घेत होती. ती हातकणंगले ग्रामीण रुग्णालयासमोर राहणाऱ्या मैत्रिणींना भेटण्यासाठी आली होती. सकाळी ११ वाजताच्या सुमारास दोन मैत्रिणींसोबत ती रेल्वे रुळाच्या बाजूने चालत जात होती. यावेळी अनुष्का रुळावरून पुढे चालत होती, तर तिच्या दोन मैत्रिणी काही अंतर मागे होत्या. रेल्वे येत असताना मैत्रिणी रेल्वे रुळाच्या बाजूने ओरडत धावत अनुष्कापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र अनुष्काला त्यांचा आवाज आला नाही व रेल्वेच्या धडकेत तिचा मृत्यू झाला.
