जेएनएन, मुंबई. National Handloom Day 2026: महाराष्ट्र राज्याची हातमाग परंपराही जगभरात प्रसिद्ध आहे. पैठणी साडी, सोलापुरी चादर, सोलापूर टेरी टॉवेल आणि विदर्भातील करवत काटी साड्या ही महाराष्ट्राच्या समृद्ध हस्तकलेची प्रतीके मानली जातात. राष्ट्रीय हँडलूम दिनानिमित्त या पारंपरिक उत्पादनांचा इतिहास, वैशिष्ट्ये आणि जागतिक ओळख जाणून घेऊया.

सोलापुरी चादर
सोलापूरमध्ये तयार होणारी सोलापुरी चादर ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय हातमाग उत्पादनांपैकी एक आहे. पूर्वी या चादरी हातमागावर विणल्या जात होत्या. कालांतराने जॅकार्ड (Jacquard) तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला, मात्र सोलापुरी चादरींची खास ओळख आजही कायम आहे.

टिकाऊपणा, आकर्षक नक्षीकाम आणि उत्कृष्ट दर्जामुळे सोलापुरी चादरींना देश-विदेशात मोठी मागणी आहे. महाराष्ट्रातील पहिले भौगोलिक निर्देशांक (GI) मानांकन मिळवणारे उत्पादन म्हणूनही सोलापुरी चादरीचा गौरव केला जातो. संयुक्त अरब अमिराती, अमेरिका, युनायटेड किंगडम, कॅनडा, दक्षिण आफ्रिका आणि कुवेतसह अनेक देशांमध्ये या चादरींची निर्यात केली जाते.

पैठणी
गोदावरी नदीच्या तीरावर वसलेल्या प्राचीन पैठण शहरातून पैठणी साडीचा उगम झाला. सातवाहन काळापासून ही विणकाम परंपरा सुरू असल्याचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. हातमागावर तयार होणाऱ्या पैठणी साडीची खास ओळख म्हणजे जरीची रुंद किनार, मोर, पोपट, मैना आणि फुलांच्या नक्षीने सजलेला पदर.

'टेपेस्ट्री' पद्धतीने विणल्या जाणाऱ्या पैठणीची पुढील आणि मागील बाजू जवळपास सारखीच दिसते. असावली, मोर, पंजा आणि मुठाडा यांसारख्या पारंपरिक नक्षी तसेच विविध आकर्षक रंगसंगतीमुळे पैठणी भारतातील सर्वात प्रतिष्ठित रेशमी साड्यांपैकी एक मानली जाते.

आज पैठणी साड्यांबरोबरच स्टोल, बेडशीट, कुशन कव्हर्स, टेबल क्लॉथ, पडदे आणि इतर गृहसजावटीच्या वस्तूही तयार केल्या जात असून त्यांना देश-विदेशातून चांगली मागणी आहे.

    सोलापूर टेरी टॉवेल
    सोलापूरमध्ये तयार होणारे सोलापूर टेरी टॉवेल हे देखील राज्यातील महत्त्वाचे हातमाग उत्पादन आहे. सुती धाग्यांपासून तयार होणाऱ्या या टॉवेलला भारत सरकारच्या GI Act 1999 अंतर्गत भौगोलिक निर्देशांक (GI) संरक्षण मिळाले आहे.

    उत्कृष्ट शोषणक्षमता, टिकाऊपणा आणि दर्जेदार विणकामामुळे सोलापूर टेरी टॉवेलला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मोठी मागणी आहे. या उद्योगामुळे सोलापूर जिल्ह्यातील सुमारे दोन लाख नागरिकांना थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला आहे.

    करवत काटी साड्या
    विदर्भातील करवत काटी साड्या महाराष्ट्राच्या पारंपरिक वस्त्रसंस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहेत. साडीच्या काठावर करवतीच्या दातांसारखी दिसणारी विशिष्ट नक्षी असल्यामुळे तिला 'करवत काटी' असे नाव मिळाले.

    या नक्षीची प्रेरणा रामटेक मंदिरातील शिल्पकलेतून घेतल्याचे मानले जाते. साड्यांबरोबरच शर्टिंग, ड्रेस मटेरियल, दुपट्टे आणि स्टोल्सही या विणकामातून तयार केले जातात. टसर सिल्क, कोरिया सिल्क, मलबेरी सिल्क आणि सूत यांच्या मिश्रणातून तयार होणाऱ्या या वस्त्रांना धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे.

    महाराष्ट्राची हातमाग परंपरा जपण्याची गरज
    महाराष्ट्रातील पैठणी, सोलापुरी चादर, सोलापूर टेरी टॉवेल आणि करवत काटी साड्या या केवळ वस्त्र किंवा उत्पादने नसून राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाच्या जिवंत परंपरा आहेत. स्थानिक हातमाग उत्पादनांची खरेदी केल्याने विणकरांना रोजगार मिळतो, पारंपरिक कलेचे संवर्धन होते आणि 'व्होकल फॉर लोकल'ला बळकटी मिळते. त्यामुळे राष्ट्रीय हँडलूम दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील या पारंपरिक उत्पादनांना प्रोत्साहन देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

    हेही वाचा: National Handloom Day 2026: हातमागाची शान पैठणी; प्रत्येक धाग्यात दडला आहे महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा