जेएनएन, मुंबई: दिवाळी म्हटली की घराघरांत फराळाची लगबग सुरू होते. चकली, चिवडा, लाडू, करंजी यांसोबतच शंकरपाळ्यांनाही फराळाच्या ताटात विशेष स्थान असते. गोड, खुसखुशीत आणि कुरकुरीत शंकरपाळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात. विशेष म्हणजे, हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त साहित्य किंवा मेहनतीची गरज नसते. घरात उपलब्ध असलेल्या काही मोजक्या पदार्थांपासून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने चविष्ट शंकरपाळे तयार करू शकता. यंदाच्या दिवाळीत बाजारातून फराळ आणण्याऐवजी घरीच शंकरपाळे बनवायचे असतील, तर जाणून घ्या ही सोपी रेसिपी.
शंकरपाळे बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- 2 वाट्या मैदा
- अर्धी वाटी साखर
- अर्धी वाटी दूध
- पाव वाटी तूप
- चिमूटभर मीठ
- अर्धा चमचा वेलची पूड (ऐच्छिक)
- तळण्यासाठी तेल किंवा तूप
शंकरपाळे बनवण्याची सोपी पद्धत
- साखरेचे मिश्रण तयार करा : सर्वप्रथम एका भांड्यात दूध कोमट करून घ्या. त्यात साखर घालून ती पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळा. त्यानंतर त्यात तूप घालून मिश्रण एकजीव करा.
- पीठ मळून घ्या : आता एका मोठ्या परातीत मैदा घ्या. त्यात चिमूटभर मीठ आणि वेलची पूड घाला. तयार केलेले दूध आणि साखरेचे मिश्रण थोडे थोडे घालत पीठ मळून घ्या. पीठ फार मऊ किंवा फार घट्ट नसावे. ते मध्यम घट्टसर मळून घ्या.
- पिठाला विश्रांती द्या : मळलेले पीठ 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवा. यामुळे पीठ व्यवस्थित सेट होईल आणि शंकरपाळे लाटणे सोपे जाईल.
- शंकरपाळ्यांना आकार द्या : आता पिठाचा एक गोळा घेऊन पोळीप्रमाणे जाडसर लाटून घ्या. त्यानंतर सुरी किंवा कटरच्या मदतीने चौकोनी किंवा डायमंड आकाराचे तुकडे कापून घ्या.
- मंद आचेवर तळून घ्या : कढईत तेल गरम करा. तेल मध्यम गरम झाल्यानंतर त्यात शंकरपाळे थोडे थोडे करून सोडा. गॅस मंद ते मध्यम आचेवर ठेवून ते सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
- थंड करून साठवून ठेवा : शंकरपाळे तळल्यानंतर टिश्यू पेपरवर किंवा चाळणीत काढा. ते पूर्णपणे थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवा.
शंकरपाळे कुरकुरीत होण्यासाठी लक्षात ठेवा या टिप्स
- पीठ मळताना दूध एकदम न घालता हळूहळू घाला.
- शंकरपाळ्यांची पोळी खूप पातळ लाटू नका.
- तेल जास्त गरम असल्यास शंकरपाळे बाहेरून लवकर लाल होतील आणि आतून कच्चे राहू शकतात.
- शंकरपाळे नेहमी मंद ते मध्यम आचेवर तळा.
- तळल्यानंतर ते पूर्ण थंड झाल्यावरच डब्यात भरून ठेवा.
हेही वाचा: Diwali Special Chivda: चिवडा कुरकुरीत होत नाही? बनवताना या सोप्या टिप्स नक्की लक्षात ठेवा
