नवी दिल्ली.Pakistan Quetta Bomb Blast : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील परिस्थिती पुन्हा एकदा नियंत्रणाबाहेर गेली आहे. बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टा येथे एक मोठा बॉम्बस्फोट झाला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात दहशत पसरली आहे. शहरातील वैद्यकीय सुविधांमध्ये आणीबाणीची स्थिती जाहीर करण्यात आली आहे. या घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला आहे.

एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, क्वेट्टामधील झरघून रोडजवळ झालेला बॉम्बस्फोट इतका भीषण होता की सर्वत्र धुराचे लोट दिसत होते. स्फोटानंतर लगेचच गोळीबार सुरू झाला. स्फोटाची माहिती मिळताच परिसरात बचाव कार्य सुरू करण्यात आले.

आत्मघातकी हल्ला

पाकिस्तानी वृत्तवाहिनी एआरवायनुसार, क्वेटामध्ये झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला. हा एक आत्मघातकी हल्ला होता ज्यामध्ये आत्मघातकी बॉम्बरचाही मृत्यू झाला.

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे, ज्यामध्ये बॉम्बस्फोटाचे दृश्य स्पष्टपणे दिसत आहे. हल्ल्यात 19 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी क्वेट्टा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

एकाच महिन्यात दोन मोठे स्फोट-

    तथापि, क्वेट्टामध्ये स्फोट होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, 2 सप्टेंबर रोजी माजी मुख्यमंत्री अख्तर मेंगल यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता. शाहवानी स्टेडियमच्या पार्किंगमध्ये त्यांची गाडी उभी असताना एक शक्तिशाली स्फोट झाला. मुख्यमंत्री मेंगल यांना कोणतीही इजा झाली नाही, परंतु त्यांच्या पक्षाचे अनेक सदस्य गंभीर जखमी झाले होते.