डिजिटल डेस्क, नवी दिल्ली -इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पुन्हा एकदा भारतावर विश्वास व्यक्त करत मोदींच्या नेतृत्व गुणांचे कौतुक केले आहे. मेलोनी म्हणाल्या की, जगभरात सुरू असलेल्या युद्धांना संपवण्यात भारत  महत्वाची भूमिका बजावू शकतो.

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या वेळी बोलताना मेलोनी यांनी भारताच्या जागतिक भूमिकेचे कौतुक केले. भारत खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे मला वाटते, असे मेलोनी यांनी एएनआयला सांगितले.

हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा भारत जागतिक स्तरावर त्याच्या राजनैतिक ताकदीसाठी आणि शांतता निर्माण करण्याच्या प्रयत्नांसाठी ओळखला जातो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मेलोनी यांच्यात अलिकडेच झालेल्या दूरध्वनी संभाषणात, दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण केली. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचे लवकर आणि शांततापूर्ण निराकरण करण्यावर त्यांनी सहमती दर्शविली. पंतप्रधान मोदींनी या संदर्भात भारताच्या पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले आहे.

द्विपक्षीय संबंधांमध्ये नवीन गती-

दोन्ही नेत्यांनी भारत आणि इटलीमधील धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या गरजेवर भर दिला. गुंतवणूक, संरक्षण, सुरक्षा, अवकाश, विज्ञान आणि तंत्रज्ञान, शिक्षण, लोकांमधील संपर्क आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईसारख्या क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेण्यात आला. त्यांनी 2025-29 साठी संयुक्त धोरणात्मक कृती आराखड्याअंतर्गत भागीदारी अधिक दृढ करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

    भारत-यूरोपीय संघ मुक्त व्यापार करार (एफटीए) लवकर पूर्ण करण्यासाठी इटलीचा पाठिंबा असल्याचे मेलोनी यांनी स्पष्ट केले. 2026 मध्ये भारतात होणाऱ्या एआय इम्पॅक्ट समिटच्या यशासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर (IMEEEC)  उपक्रमांतर्गत कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी पावले उचलण्यास दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शविली.

    मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक-

    मेलोनी यांनी 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदींना 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्या नेतृत्व कौशल्याचे कौतुक केले होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांची ताकद, दृढनिश्चय आणि लाखो लोकांचे नेतृत्व करण्याची क्षमता प्रेरणादायी आहे, असे त्यांनी इंस्टाग्रामवर लिहिले होते.

    मेलोनी यांनी भारत आणि इटलीमधील संबंध अधिक मजबूत करण्याची इच्छा व्यक्त केली. भारत आणि युरोपियन युनियन एक व्यापक आणि संतुलित मुक्त व्यापार करार अंतिम करण्यासाठी वचनबद्ध आहेत ज्याचा फायदा दोन्ही बाजूंच्या व्यवसायांना आणि ग्राहकांना होईल.