एजन्सी, नायजेरिया: दक्षिण नायजेरियात अंत्यसंस्कारासाठी लोकांना घेऊन जाणारी एक बोट उलटली असून, या दुर्घटनेत किमान 24 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आपत्कालीन सेवांनी दिली आहे.

देशाच्या दक्षिण-दक्षिण भागातील बायेल्सा राज्यात शुक्रवारी ही बोट एका समुदायातील प्रवाशांना दुसऱ्या समुदायात दफनविधीच्या कार्यक्रमासाठी घेऊन जात असताना बुडाली, असे नायजेरियाच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे प्रवक्ते मँझो एझेकी यांनी एका निवेदनात म्हटले आहे. 

किती लोक बेपत्ता आहेत हे स्पष्ट न करता त्यांनी सांगितले की, शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.

पोलीस प्रवक्ते मुसा मोहम्मद यांनी शुक्रवारी सांगितले की, इतर 24 जणांना वाचवण्यात आले असून त्यांना वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. बोटीत नेमके किती प्रवासी होते याचा अंदाज अधिकाऱ्यांनी सांगितलेला नाही. 

मोहम्मद यांनी सांगितले की, प्राथमिक अहवालानुसार बोटीत तांत्रिक बिघाड झाला होता. 

मोहम्मद यांच्या मते, प्रवाशांनी बोट चालकाला बोट किनाऱ्याकडे वळवण्यास सांगितले होते, परंतु त्याने कथितरित्या नकार दिला. यानंतर बोट चालक घटनास्थळावरून पळून गेल्याचे वृत्त आहे, तर बोटीच्या व्यवस्थापकाला ताब्यात घेण्यात आले आहे. 

    बायेल्सा राज्य सरकारने यावर प्रतिक्रिया देताना बोट चालक आणि प्रवाशांना सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. 

    "क्षमतापेक्षा जास्त प्रवासी भरणे, अतिवेग, निष्काळजीपणा आणि लाईफ जॅकेटशिवाय प्रवास करणे थांबले पाहिजे. कोणताही प्रवास जीवापेक्षा मोठा नाही," असे बायेल्साच्या माहिती आयुक्त एबियुवौ कोकू-ओबियाई यांनी शनिवारी एका निवेदनात म्हटले आहे. 

    नायजेरियामध्ये बोट दुर्घटना सामान्य आहेत. सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीच्या अभावामुळे देशात अनेकदा लाईफ जॅकेटशिवाय सदोष बोटी चालवल्या जातात.