जेएनएन, मुंबई: गावात राहून स्वतःची स्वप्नं पूर्ण करायची की शहरात करिअर घडवायचं – या द्वंद्वावर भाष्य करणारा ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ या मराठी सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात गाव आणि शहर या दोन भिन्न जगातील वास्तव, संघर्ष आणि नातेसंबंध यांची सांगड घालण्यात आली आहे. प्रेक्षकांना भावणारा विषय आणि हलक्याफुलक्या शैलीत सादर झालेला ट्रेलर सोशल मीडियावर उत्सुकता निर्माण करत आहे.
हा सिनेमा सिने कथा कीर्तन, चंद्रभागा स्टुडिओ आणि एम. व्ही. शरतचंद्र यांच्या संयुक्त निर्मितीमध्ये साकारला आहे. दिग्दर्शन आणि संपादनाची धुरा विजय काळमकर यांनी सांभाळली असून, कथा, पटकथा व संवाद लेखन अमरजीत आमले यांनी केले आहे. चित्रपटात वीणा जमकर, प्रल्हाद कुडतारकर, संकीत कामत, स्वानंदी टिकेकर, वैभव मंगले, सुनील तावडे, अमेय परब, अंगहा, शेखर बेटकर यांसारखे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी रंगनाथ बाबू गोगिनेनी यांनी घेतली आहे तर ध्वनीसंयोजन अविनाश बाबुराव सोनवणे यांचे आहे.
‘कुर्ला टू वेंगुर्ला’ संपूर्ण महाराष्ट्रात 19 सप्टेंबर 2025 रोजी प्रदर्शित होणार असून, ग्रामीण जीवनाचे वास्तव आणि शहरी मोह या दोन्हींचे दर्शन घडवणारा हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच भावेल असे मत व्यक्त केले जात आहे.