जेएनएन, मुंबई. मराठी सिनेसृष्टीत लवकरच एक मोठा मल्टीस्टारर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘थप्पा’ या आगामी चित्रपटात ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरू प्रमुख भूमिकेत झळकणार असून तिच्यासोबत मराठीतील अनेक दमदार कलाकार झळकणार आहेत.
या चित्रपटात रिंकूसोबत सखी गोखले, वैदेही परशुरामी, गौरव मोरे, साईकांत कामत आणि सिद्धार्थ बोढके हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. विशेष म्हणजे सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असलेला डॅनी पंडित या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार आहे.
‘थप्पा’चे दिग्दर्शन सिड विंचूरकर करणार असून हा चित्रपट बिग बजेट प्रकल्प म्हणून ओळखला जात आहे. हिंदी मल्टीस्टारर चित्रपटांना टक्कर देणारा हा मराठी प्रकल्प ठरेल, असा दावा निर्मात्यांनी केला आहे.
रिंकू राजगुरूने ‘सैराट’पासून ते ‘कागर’, ‘आठवा रंग प्रेमाचा’ आणि हिंदी अँथोलॉजी ‘अँकही कहानिया’पर्यंत विविध भूमिकांमधून स्वतःची अभिनय क्षमता सिद्ध केली आहे. त्यामुळे ‘थप्पा’मधील तिचा अभिनय आणि डॅनी पंडितसारख्या सोशल मीडिया स्टारसोबतची जोडी प्रेक्षकांसाठी एक खास आकर्षण ठरणार आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत नवीन प्रयोगांना आणि मोठ्या बजेटच्या सिनेमांना नेहमीच प्रेक्षकांची उत्सुकता लाभत आली आहे. त्यामुळे ‘थप्पा’बाबत प्रेक्षकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली असून, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर धमाकेदार यश मिळवेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
‘थप्पा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध दिग्दर्शक सिड विंचूरकर करत असून, या चित्रपटाची चर्चा सध्या जोरात रंगली आहे.

या चित्रपटाचे निर्मितीचे सूत्र मेहुल शाह आणि अमित भानुशाली यांनी हाती घेतले आहे. चित्रपटाला योग्य चेहरा देण्याचे काम कास्टिंग डायरेक्टर शांतनू भाकरे यांनी पार पाडले आहे. चित्रपटाचा प्रचार व प्रसाराची जबाबदारी अमृता माने यांनी पीआरच्या माध्यमातून सांभाळली आहे, तर डिजिटल जगतात या चित्रपटाला पोहोचवण्याचे काम डिजिटल मार्केटिंग तज्ज्ञ दीपक परुळेकर यांच्याकडे आहे.
‘थप्पा’ या चित्रपटामुळे नवी कथा, नवे अनुभव आणि मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळा ठसा उमटेल, अशी उत्सुकता प्रेक्षकांत निर्माण झाली आहे.
हेही वाचा:Chhaya Kadam: शिमला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये छाया कदम यांचा सन्मान