जेएनएन, मुंबई : मराठा साम्राज्याच्या पराक्रमावर आधारित ऐतिहासिक चित्रपटांची मालिका ‘शिवराज अष्टकम’ रसिकांच्या मनात कायम स्मरणीय ठरली आहे. या मालिकेतील सहाव्या चित्रपटाची घोषणा दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांनी केली आहे. ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या नावाने साकार होणारा चित्रपट १९ फेब्रुवारी २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

दिगपाल लांजेकर दिग्दर्शित हा चित्रपट ‘शिवराज अष्टकम’ मालिकेतील सहावे ‘शिवपुष्प’ असून, याआधी ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘शेर शिवराज’, ‘पावनखिंड’ आणि ‘सुभेदार’ हे पाच चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने सहाव्या चित्रपटाबाबतही प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

पुढील चित्रपटाची घोषणा करताना दिगपाल लांजेकर यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी लिहिले आहे –
“तुम देखो.. तुम्हारा बाप देख्या.. तुम्हारा पातशाह देख्या..
छत्रपती शिवरायांची गर्जना घुमणार..
जगभरातील शिवभक्तांच्या आग्रहाचा सन्मान करून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र भवानीच्या चरणी अर्पण करीत आहोत शिवराज अष्टकातील सहावे शिवपुष्प – ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा..’”

या घोषणेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद उमटत असून, प्रेक्षक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या प्रदर्शानाची आतुरतेने वाट पाहत आहेत.