जेएनएन, मुंबई : राज्यातील मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या आपत्तीग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी समाजातील विविध क्षेत्रांतून मदतीचा हात पुढे केला जात आहे. त्यात आता मराठी रंगभूमीचे ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे.

शिंदे यांनी ‘सखाराम बाइंडर’ या नाटकाचे पुढील दहा प्रयोग केवळ ₹१ मानधन घेऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रयोगांमधून मिळणारे उर्वरित मानधन संपूर्णपणे महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

दरम्यान, आर्यन्स ग्रुपचे सीईओ मनोहर जगताप यांनी सांगितले की दिल्लीमध्ये होणाऱ्या ‘सखाराम बाइंडर’च्या दोन्ही प्रयोगांचा नफा देखील पूरग्रस्त नागरिकांना देण्यात येणार आहे. नुकताच दिल्लीतील शुभारंभाचा प्रयोग पार पडला असून यावेळी ही घोषणा करण्यात आली.

‘सखाराम बाइंडर’ या सुमुख चित्र निर्मित नाटकात सयाजी शिंदे यांच्यासोबतच नेहा जोशी, अनुष्का बोऱ्हाडे, चरण जाधव, अभिजीत झुंजारराव इत्यादी कलाकार भूमिका साकारत आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन अभिजीत झुंजारराव यांनी केले असून संगीत आशुतोष वाघमारे, नेपथ्य सुमीत पाटील, प्रकाशयोजना श्याम चव्हाण, रंगभूषा शरद सावंत आणि वेशभूषा तृप्ती झुंजारराव यांची आहे.

हेही वाचा: Bhagwat: 'सचिव' ला खलनायकाच्या भूमिकेत पाहून पाणावतील तुमचे डोळे, OTT वर कधी आणि कुठे  पाहायचा चित्रपट