जेएनएन, मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील बहुचर्चित ‘देऊळ बंद २’ (Deool Band 2) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करताना दिसत आहे. पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळालेल्या या चित्रपटाने दुसऱ्या दिवशीही कमाईचा वेग कायम ठेवला आहे. अवघ्या दोन दिवसांत चित्रपटाने जगभरात तब्बल 5.90 कोटींची ग्रॉस कमाई करत मराठी सिनेसृष्टीत आपली मजबूत छाप पाडली आहे.
चित्रपटाने भारतात एकूण 5.90 कोटींची ग्रॉस कमाई केली असून नेट कमाईचा आकडा 5 कोटींवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, परदेशातील कमाई अद्याप नोंदवली गेलेली नसली तरी देशांतर्गत प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक मानला जात आहे.
पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारी ‘देऊळ बंद २’ने 2.98 कोटी ग्रॉस आणि 2.45 कोटी नेट कमाई केली होती. त्या दिवशी चित्रपटाचे 1,175 प्रयोग झाले असून थिएटर ऑक्युपन्सी 41 टक्के होती. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ झाली. शुक्रवारी चित्रपटाने 3.01कोटी ग्रॉस आणि 2.55 कोटी नेट कमाई केली. तसेच प्रयोगांची संख्या वाढून १,२३६ वर पोहोचली.
जरी दुसऱ्या दिवशी ऑक्युपन्सी 36 टक्क्यांवर आली असली तरी वाढलेल्या शोसंख्येमुळे चित्रपटाच्या एकूण कमाईत वाढ झाली आहे. ग्रामीण भागासह शहरांमध्येही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
‘देऊळ बंद 2’च्या कथानकातील सामाजिक आशय, दमदार संवाद आणि कलाकारांच्या अभिनयामुळे प्रेक्षक चित्रपटाकडे आकर्षित होत आहेत. ट्रेलरपासूनच चर्चेत असलेल्या या चित्रपटाला आता बॉक्स ऑफिसवरही यश मिळताना दिसत आहे. आगामी शनिवार-रविवारी चित्रपटाच्या कमाईत आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2’ हा 2015 साली प्रदर्शित झालेल्या ‘देऊळ बंद’ या चित्रपटाचा दुसरा भाग आहे. पहिल्या भागात अभिनेता गश्मीर महाजनी याने मुख्य भूमिका साकारली होती, तर अभिनेत्री निवेदिता सराफ यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती.
हेही वाचा: Deool Band 2 Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर ‘देऊळ बंद 2’चा धडाका; पहिल्याच दिवशी कोट्यवधींची कमाई
