जेएनएन, मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘देऊळ बंद 2’ची जोरदार चर्चा सुरू असून, प्रदर्शित होताच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. श्रद्धा, समाजव्यवस्था आणि अध्यात्म यांचा वेध घेणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटगृहांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली आणि अनेक ठिकाणी शो हाऊसफुल्ल झाले.

दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, महेश मांजरेकर, स्नेहल तरडे, प्रसाद ओक आणि गश्मीर महाजनी यांसारख्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटातील दमदार संवाद, भावनिक कथानक आणि धार्मिक विषयाची मांडणी यामुळे प्रेक्षक चित्रपटाशी जोडले जात आहेत.

सॅकलिंकच्या माहितीनुसार, ‘देऊळ बंद 2’ने पहिल्याच दिवशी देशभरात सुमारे 2.45 कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. तर ग्रॉस कलेक्शन जवळपास 2.89 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे आहे. मराठी चित्रपटांसाठी ही कमाई उल्लेखनीय मानली जात असून, आगामी विकेंडमध्ये चित्रपटाची कमाई आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, या चित्रपटाचा पहिला शो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर ठेवण्यात आला होता. पहाटेच्या शोसाठीही मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक उपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर आणि औरंगाबादसह अनेक शहरांमध्ये चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भागातही या चित्रपटाची क्रेझ दिसून येत आहे.

सोशल मीडियावरदेखील ‘देऊळ बंद 2’ची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. अनेक प्रेक्षकांनी चित्रपटातील भावनिक प्रसंग, पार्श्वसंगीत आणि कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. काहींनी हा चित्रपट केवळ मनोरंजन नसून समाजाला विचार करायला लावणारा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

चित्रपटातील धार्मिक आणि सामाजिक प्रश्नांची मांडणी प्रेक्षकांना भावत असून, त्यामुळे कुटुंबासह चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरकडे वळत आहेत. पहिल्या दिवसाच्या कमाईनंतर आता दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी चित्रपट किती मोठी झेप घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: भय आणि गूढतेचं रहस्यमय दार उघडणार ! ‘तुंबाडची मंजुळा’चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज