जेएनएन, मुंबई: मराठी मनोरंजनविश्वात सध्या अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जोरदार चर्चा सुरू आहे. माधुरी दीक्षित यांच्याकडे या कार्यक्रमाची सूत्रसंचालनाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, त्यांच्या मराठी भाषेतील संवादशैलीवर काही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अभिनेते संजय मोने यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

संजय मोने यांनी आपल्या पोस्टमध्ये माधुरी दीक्षित यांच्या सूत्रसंचालनावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. त्यांनी लिहिले, “का कुणास ठाऊक, पण आज दीक्षित बाईंचा कार्यक्रम बघितला आणि एक जुनी मराठी म्हण आठवली, ‘कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभट्टाची तट्टाणी.’ त्यापेक्षा सचिन खेडेकर तोच कार्यक्रम अप्रतिम सादर करायचे.”

त्यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी संजय मोने यांच्या मताला सहमती दर्शवत माधुरी यांच्या सूत्रसंचालनावर प्रश्न उपस्थित केले, तर काहींनी त्यांच्या मराठी भाषेतील प्रयत्नांचे समर्थन केले.

एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देताना म्हटले की, हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावलेल्या मराठी अभिनेत्रीची निवड करायचीच होती, तर उर्मिला मातोंडकर अधिक योग्य ठरली असती. मराठी माध्यमातून शिक्षण झाल्यामुळे तिची भाषेवरील पकड आणि अशा कार्यक्रमासाठी आवश्यक असलेली उत्स्फूर्तता अधिक चांगली असती, असेही त्यांनी नमूद केले. तर काहींनी पल्लवी जोशी, रेणुका शहाणे यांच्यासारख्या अभिनेत्रींची नावेही पर्याय म्हणून सुचवली आहेत.

दुसरीकडे, माधुरी दीक्षित यांच्या समर्थनार्थही अनेकजण पुढे आले आहेत. एका नेटकऱ्याने महत्त्वाचा मुद्दा मांडताना म्हटले की, महाराष्ट्रात अनेक हिंदी कलाकार गेल्या ३० ते ५० वर्षांपासून काम करत असले, तरी त्यांना मराठी भाषा बोलता येत नाही. अशा परिस्थितीत माधुरी दीक्षित यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत संपूर्ण कारकीर्द घालवल्यानंतरही मराठीत सूत्रसंचालन करण्याची तयारी दाखवली, ही कौतुकास्पद बाब आहे.

माधुरी यांच्या बोलण्यात काही चुका असतील किंवा सूत्रसंचालनात कमतरता जाणवत असेल, तर त्यावर टीका जरूर करावी; मात्र मराठीत काम करण्यासाठी त्या करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुकही व्हायला हवे, असे मत या नेटकऱ्याने व्यक्त केले. या मताला इतरांनीही पाठिंबा दिला आहे.

    दरम्यान, काही प्रेक्षकांनी माधुरी यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली असली, तरी अनेकांनी त्यांच्या लोकप्रियतेचे आणि मराठी भाषेत काम करण्याच्या प्रयत्नांचे समर्थन केले आहे. त्यामुळे माधुरी दीक्षित यांच्या सूत्रसंचालनावरून सोशल मीडियावर मतमतांतरे पाहायला मिळत आहेत.

    एकीकडे संजय मोने यांची टीका, तर दुसरीकडे माधुरी यांच्या समर्थनार्थ उमटणारे सूर; आता या चर्चेवर माधुरी दीक्षित काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.