जेएनएन, मुंबई – बालकलाकार साईराज केंद्रे लवकरच मराठी चित्रपटसृष्टीत मोठ्या भूमिकेत दिसणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्या आगामी चित्रपट ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ मध्ये साईराज एक महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाद्वारे साईराजचा मोठ्या पडद्यावर प्रवेश होणार आहे.

‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ या व्हायरल गाण्यातून घराघरात पोहोचलेला साईराज केंद्रे अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला. त्यानंतर विविध म्युझिक व्हिडिओंमध्ये आणि जाहिरातींमध्ये झळकलेल्या या लहानग्याने आता हेमंत ढोमे यांच्या सामाजिक आशय असलेल्या चित्रपटात भूमिका मिळवली आहे.

 ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ हा चित्रपट मराठी भाषेतील शिक्षण, मातृभाषेचं महत्त्व आणि ग्रामीण शैक्षणिक व्यवस्थेवर आधारित आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन व लेखन हेमंत ढोमे यांनी केले असून, निर्माता आनंद एल राय आणि क्षिती जोग आहेत. चित्रपटाचं चित्रीकरण अलिबाग आणि आसपासच्या परिसरात पार पडलं असून, लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

चित्रपटात दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर,  अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर,  क्षिती जोग , कादंबरी कदम, तसेच पुष्कराज चिरपुटकर यांच्यासह सोशल मिडीया स्टार प्राजक्ता कोळी प्रथमच मराठी चित्रपटात दिसणार आहे. सोबतच साईराज केंद्रे देखील या चित्रपटात झळकणार असल्याची चर्चा आहे. हा चित्रपट येत्या 1जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.

याबाबतची एक पोस्ट साईराज केंद्रेने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केली असून, कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन करून…

चलचित्र मंडळी अभिमानाने सादर करत आहे…मराठी शाळांचा गौरव सोहळा!

    ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ 1 जानेवारी 2026 पासून प्रवेश सुरू…आता मराठी शाळा पुन्हा भरणार!