जेएनएन, मुंबई. Bigg Boss Marathi 6: लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस मराठीमधून स्पर्धक सागर कारंडेची एक्झिट झाली आहे. घरातील त्याचा प्रवास थांबल्यानंतर सागरने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत चाहत्यांचे मनापासून आभार मानले आहेत.
शोदरम्यान सागर कारंडेने संयमी आणि प्रामाणिक खेळ करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. टास्कमध्ये त्याची शांत भूमिका आणि नात्यांमध्ये प्रामाणिकपणा यामुळे प्रेक्षकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, अंतिम क्षणी मिळालेल्या कमी मतांमुळे त्याचा प्रवास थांबला.
घरातून बाहेर पडल्यानंतर सागरने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तो म्हणाला, “तुमच्या प्रेमानेच मला प्रत्येक कठीण क्षणी उभं राहायला ताकद दिली. तुमचा प्रत्येक शब्द, प्रत्येक सपोर्ट माझ्यासाठी प्रेरणा बनला. ही फक्त माझी जर्नी नाही… ही आपली सगळ्यांची जर्नी आहे. कधी पडलो, कधी थकलो… पण तुमच्या प्रेमामुळे पुन्हा उभा राहिलो. तुमचा विश्वास हेच माझं सर्वात मोठं यश आहे.”
त्याने पुढे महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे आभार मानत, “माझ्यावर इतकं निस्वार्थ प्रेम केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. असंच प्रेम, साथ आणि आशीर्वाद कायम राहू दे. तुम्ही आहात म्हणूनच मी आहे. महाराष्ट्राच्या प्रेमाला सलाम!” असेही म्हटले आहे.
दरम्यान, सागरच्या एक्झिटनंतर घरातील समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता पुढील आठवड्यात कोणता स्पर्धक बाहेर पडणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
