जेएनएन, मुंबई: प्रेम, भावना आणि निसर्गरम्य वातावरणाची सुंदर सांगड घालणारं ‘याड लागलं’ हे नवं मराठी रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री पूजा चव्हाण आणि अभिनेता आकाश यादव यांची नवी जोडी या गाण्यात पाहायला मिळत आहे. गाणं प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली असून, गाण्याचे व्हिडीओही व्हायरल होत आहेत.
पूजा चव्हाण-आकाश यादवची नवी जोडी
‘याड लागलं’ या गाण्यात पूजा चव्हाण आणि आकाश यादव यांच्यातील प्रेमाची केमिस्ट्री पाहायला मिळते. गावाकडच्या साध्या, निरागस आणि निस्वार्थ प्रेमाची कथा या गाण्यातून मांडण्यात आली आहे. प्रेमात पडलेल्या दोन तरुणांच्या नात्यापासून ते भविष्यातील स्वप्नांपर्यंतचा प्रवास गाण्याच्या माध्यमातून उलगडण्यात आला आहे.
या गाण्याचं चित्रीकरण सातारा जिल्ह्यातील दुर्गळवाडी परिसरातील निसर्गरम्य ठिकाणी करण्यात आलं आहे. त्यामुळे गाण्यातील प्रेमकहाणीला निसर्गाचीही सुंदर पार्श्वभूमी मिळाली आहे.
आकाश यादव यांनी लिहिले गाण्याचे बोल
‘याड लागलं’ या गाण्याची निर्मिती आणि दिग्दर्शन समाधान पवार, सुबोध गोतपागर, शुभम यादव आणि आकाश यादव यांनी केलं आहे. गाण्याला दर्शन सुतार यांनी संगीत दिलं असून निखिल मधाळे यांनी ते गायलं आहे. विशेष म्हणजे या गाण्याची गीतरचना अभिनेता आकाश यादव यांनी केली आहे.
गाण्याचं छायाचित्रण सचिन घाटगे यांनी केलं असून व्हिडीओ एडिटिंगची जबाबदारी आकाश यादव यांनी सांभाळली आहे. मेकअप रूपेश जाधव, तर हेअर आर्टिस्ट म्हणून दत्तात्रय पवार यांनी काम केलं आहे. मराठी वर्ल्ड प्रोडक्शनच्या बॅनरखाली हे गाणं तयार करण्यात आलं आहे.
‘असं निस्वार्थ प्रेम करणारी माणसं सहज मिळत नाहीत’
गाण्याबद्दल बोलताना आकाश यादव म्हणाले, “आजच्या सोशल मीडियाच्या जगात असं निस्वार्थ प्रेम करणारी माणसं सहज मिळत नाहीत. पण गावातील एक साधं, सुंदर प्रेम करणाऱ्या दोन प्रेमीयुगुलांची ही कथा या गाण्यात दर्शवली आहे.”
शूटिंगच्या अनुभवाबद्दलही त्यांनी सांगितलं की, गाण्याच्या शूटला खूप मजा आली. प्रेक्षकांना हे गाणं आवडत असून सोशल मीडियावरही त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं.
आकाश यादव यांनी चाहत्यांना या गाण्यावर प्रेम करण्याचं आणि ‘याड लागलं’ या गाण्यावर व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर शेअर करण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे आगामी काळात हे गाणं सोशल मीडिया ट्रेंडमध्ये आणखी वरचढ ठरतं का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
हेही वाचा: मोहसिन खानच्या आयुष्यात नव्या पर्वाची सुरुवात; तमन्नासोबत साखरपुड्याचे फोटो व्हायरल
