जेएनएन, मुंबई: नवरात्रोत्सवानिमित्त जेएसबी प्रोडक्शन प्रस्तुत आणि दिग्दर्शक विकी वाघ दिग्दर्शित “अंबाबाई” हे नवे रॅप साँग नुकतेच प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांकडून या गाण्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विकी वाघने यावेळी गायक म्हणूनही आपली कला सादर केली आहे. “अंबाबाई” हे गाणे त्याने स्वतः लिहिले, संगीतबद्ध केले आणि दिग्दर्शितही केले आहे. करण गायकवाड, नेहा पोसरेकर, योगिता माने, संतोष पाखरे यांच्यासह विकी वाघ स्वतःही या गाण्यात भूमिका साकारताना दिसतो. कोल्हापूर येथे या गाण्याचे चित्रीकरण झाले असून निर्मिती जेएसबी प्रोडक्शनने केली आहे.
या गाण्यामार्फत महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या पण नेहमीच समाजाकडून दुर्लक्षित राहिलेल्या लोककलावंतांची व्यथा मांडण्यात आली आहे. किन्नर, संबळ वादक, वासुदेव, लावणी कलावंत, गोंधळी आणि जोगवा मागणाऱ्या जोगतीण या कलाकारांना आदरांजली अर्पण करण्याचा प्रयत्न “अंबाबाई” गाण्यातून करण्यात आला आहे.

गाण्याच्या संकल्पनेविषयी बोलताना विकी वाघ म्हणाले, “नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने लिहिलेल्या या गाण्यातून मला समाजाला एक संदेश द्यायचा होता. आपल्याला संस्कृती समृद्ध करणाऱ्या लोककलावंतांचा आदर करायला हवा.
गाण्याच्या ऊर्जेमुळे आम्ही सलग २४ तास शूटिंग केले आणि प्रेक्षकांना ‘सगळ्यांचा आदर करा’ हा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला.” सोशल मीडियावर या गाण्याची जोरदार चर्चा होत असून नवरात्राच्या पार्श्वभूमीवर “अंबाबाई” गाणे प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे.