जेएनएन, मुंबई : कोकणातील सांस्कृतिक वारसा, लोककला आणि स्थानिक समस्यांवर आधारित ‘दशावतार’ (Dasavatar) हा मराठी चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. ग्रामीण जीवन, परंपरा आणि जमीनसंबंधी गंभीर प्रश्न यांचा संगम दाखवणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे.
चित्रपटगृहांत गर्दी उसळली असून, सोशल मीडियावर त्याला कोकणातील ‘कांतारा’ असे विशेषण मिळाले आहे. अमराठी प्रेक्षकांनीही या चित्रपटाची दखल घेतली असून, बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई सुरू आहे.
राज ठाकरेंकडून कौतूक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच ‘दशावतार’ पाहिला. कलाक्षेत्र आणि चित्रपटांविषयी विशेष अभिरुची असलेले ठाकरे यांनी सोशल मीडियावर आपली सविस्तर प्रतिक्रिया देत चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. त्यांनी लिहिले की, “दशावतार या चित्रपटात गंभीर विषयाला हात घालण्यात आला आहे. जमिनी वाचवण्याचा मुद्दा मी अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील जनतेसमोर मांडत आलो आहे. जमिनी म्हणजे अस्तित्व. हा प्रश्न फक्त कोकणापुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राशी संबंधित आहे. दिग्दर्शक सुबोधने अत्यंत चलाखीने हा विषय मांडला आहे आणि दशावताराच्या सर्व रुपांतून प्रेक्षकांना ती जाणीव करून दिली आहे.”
कोकणी दशावतार नाट्यप्रकार
‘दशावतार’ हा चित्रपट पारंपारिक कोकणी दशावतार नाट्यप्रकाराच्या पार्श्वभूमीवर पुढे सरकतो. गावाच्या जमिनी, स्थानिकांच्या उपजीविकेचा प्रश्न आणि त्यावर होणारे राजकीय-आर्थिक आघात या मुद्द्यांवर कथा आधारित आहे. लोककलेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. चित्रपटात परंपरा आणि आधुनिकतेचा संघर्ष प्रभावी पद्धतीने दाखवण्यात आला आहे.
चित्रपटातील कलाकार
चित्रपटात बाबुली यांच्या व्यक्तिरेखेतून दशावतार नाट्यकलेची ओढ आणि त्याचबरोबर गावकऱ्यांच्या जमिनी वाचवण्याची लढाई दाखवली आहे. प्रियदर्शनी इंदलकर, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे यांच्यासह अनेक ताकदीचे कलाकार यात झळकले आहेत. त्यांच्या अभिनयामुळे कथेला वास्तवाचा गहिरेपणा लाभला आहे.
हेही वाचा : Dashavatar Box Office Collection : ‘दशावतार’ चित्रपटाची पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर कमाईची घोडदौड