जेएनएन, मुंबई. Dashavatar Box Office Collection : मराठी चित्रपटसृष्टीत पारंपरिक आणि हृदयाला भिडणाऱ्या कथानकासह नुकताच प्रदर्शित झालेला ‘दशावतार’ चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. अनुभवी दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून, पहिल्याच तीन दिवसांत या चित्रपटाने तब्बल ₹4.69 कोटींचा नेट बॉक्स ऑफिस कलेक्शन नोंदवला आहे.
चित्रपटाची मध्यवर्ती व्यक्तिरेखा म्हणजे बाबुली – दशावतार नाटककलेशी एकरूप झालेला असा कलाकार, ज्याचे नाव घेताच लोकांना गावोगावी दशावतारची आठवण येते. पारंपारिक रंगभूमीवर संपूर्ण आयुष्य खर्च केलेल्या या कलाकाराला वय वाढले तरीही रंगभूमीपासून दूर जाण्याची तयारी नाही. डॉक्टर आणि मुलगा माधव (सिद्धार्थ मेनन) यांचे विनवणे असूनही बाबुली आपले काम सोडण्यास तयार नसतो. मात्र, मुलगा नोकरी मिळाल्यानंतर निवृत्ती घेण्याचे तो वचन देतो. अखेर माधवला नोकरी मिळाल्यावर बाबुली महाशिवरात्रीच्या उत्सवात आपले शेवटचे सादरीकरण जाहीर करतो. दुसरीकडे माधव त्या शुभ प्रसंगी त्याची प्रेयसी वंदना (प्रियदर्शिनी इंदलकर) हिला प्रपोज करण्याचे ठरवतो. पण दुर्दैवी घटना घडते आणि यानंतर घडामोडी पूर्णपणे वेगळे वळण घेतात.
या कथानकाला पडद्यावर जिवंत करण्यासाठी महेश मांजरेकर, सिद्धार्थ मेनन, भरत जाधव, प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनय बेर्डे, रवी काळे, विजय केंकरे, सुनील तावडे, आरती वडगबाळकर आणि दिलीप प्रभावळकर यांसारख्या दमदार कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. अनुभवी आणि तरुण कलाकारांचा समतोल मेळ घालण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरले आहेत.
सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी देवेंद्र गोलतकर यांनी सांभाळली असून, दृश्य सौंदर्य आणि लोककलेचा पारंपरिक रंगतदार आविष्कार पडद्यावर खुलून दिसतो. संगीताची जबाबदारी ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी सांभाळली आहे, मात्र अद्याप चित्रपटातील कोणतेही गाणे रिलीज झालेले नाही. त्यामुळे संगीताची सरप्राईज एखाद्या वेगळ्याच टप्प्यावर प्रेक्षकांना मिळेल, अशी उत्सुकता आहे.
‘दशावतार’ या चित्रपटाच्या निर्मितीमागे ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस यांचा सहभाग आहे. ग्रामीण पार्श्वभूमी, लोककलेचे दर्शन आणि पिढ्यांमधील नात्यांचे संघर्ष या तिन्हींचा सुंदर संगम या चित्रपटात पाहायला मिळतो. बॉक्स ऑफिसच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी 0.58 कोटी, दुसऱ्या दिवशी 1.39 कोटी आणि तिसऱ्या दिवशी तब्बल 2.72 कोटी इतकी कमाई केली आहे. या आकड्यांवरून प्रेक्षकांचा प्रतिसाद किती उत्स्फूर्त आहे, हे स्पष्ट दिसते.
हेही वाचा: Bigg Boss 19 Double Elimination: हा स्पर्धक घराबाहेर पडल्याने चाहते निराश, म्हणाले हे तर अनफेयर एविक्शन