जेएनएन, मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या 'आदी अनंत' या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत त्यांनी चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयासह दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर महेश लिमये यांच्या कामाचे विशेष कौतुक केले आहे. विशेष म्हणजे, 'रामायण' पाहून तुम्ही भारावून गेला असाल, तर 'आदी अनंत' हा चित्रपटही आवर्जून पाहायला हवा, असे आवाहन त्यांनी प्रेक्षकांना केले आहे.

प्रवीण तरडे यांनी आपल्या पोस्टमध्ये महेश लिमये यांच्या कामावर विशेष प्रकाश टाकला. ते म्हणाले की, 'रामायण' आणि 'आदी अनंत' या दोन्ही सुंदर कलाकृतींमागे एक मराठी माणूस आहे आणि त्याचे नाव महेश लिमये आहे. तंत्रज्ञाला सहसा चेहरा नसतो, मात्र सिनेमाचा चेहरामोहरा बदलण्याची ताकद त्याच्यात असते, हे महेश लिमये यांनी सिद्ध करून दाखवले आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये कलाकारांच्या अभिनयाइतकीच त्यांच्या कॅमेऱ्याची नजर आणि दिग्दर्शनाचीही चर्चा झाली आहे.

अशोक सराफ आणि संकर्षणच्या अभिनयाचे केले कौतुक
चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचेही प्रवीण तरडे यांनी कौतुक केले. अशोक सराफ आणि संकर्षण खऱ्या आजोबा-नातवाप्रमाणे वाटतात, असे त्यांनी नमूद केले. संकर्षण कॅमेऱ्यासमोर अतिशय सहजपणे वावरतो, तर सखी गोखले हिनेही आपल्या अभिनयातून प्रभाव पाडल्याचे त्यांनी म्हटले. याशिवाय योगेश शिरसाट यांचाही अभिनय भाव खाऊन गेल्याचे त्यांनी सांगितले.

चित्रपटाचे लेखन मनाला भिडणारे असून काही प्रसंग डोळ्यांत पाणी आणतात, अशा शब्दांत त्यांनी कथालेखनाचे कौतुक केले. तसेच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या अभिनयाला त्यांनी 'हॅट्स ऑफ' म्हणत दाद दिली.

महेश लिमये यांच्यासाठी आवर्जून पाहावा 'आदी अनंत'
प्रवीण तरडे यांच्या मते, 'आदी अनंत' हा चित्रपट पाहण्यामागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे महेश लिमये यांचे काम. दिग्दर्शकाची विचारशक्ती आणि सिनेमॅटोग्राफरची नजर या दोन्ही जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत प्रभावीपणे सांभाळल्या आहेत. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांनी आवर्जून पाहावा, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रवीण तरडे यांच्या या कौतुकामुळे 'आदी अनंत' चित्रपटाची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, एका मराठी कलाकाराने दुसऱ्या मराठी कलाकाराच्या तांत्रिक आणि कलात्मक योगदानाचे केलेले हे कौतुकही लक्षवेधी ठरत आहे.

हेही वाचा: कान्सनंतर पुन्हा एकदा छाया कदम यांची आंतरराष्ट्रीय भरारी! ‘स्नो फ्लॉवर’साठी मिळाला विशेष पुरस्कार