जेएनएन, मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत लावणी आणि लोककलेचा वारसा जपणारा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. झी स्टुडिओज् आणि अथांश कम्युनिकेशन्स निर्मित 'फुलवरा' या आगामी मराठी चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित झाला आहे. 'घुंगरू पायाला नाई गं, काळजाला बांधून नाचावं!' या दमदार ओळींसह टीझरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे, अभिनेत्री वैदेही परशुरामी हिनेही या टीझरवर खास प्रतिक्रिया दिली आहे.
अस्सल मराठमोळ्या लावणीचा अनुभव
'फुलवरा'च्या टीझरमधून अस्सल मराठमोळ्या लावणीची झलक पाहायला मिळत आहे. 'संस्कृतीचा ठेवा, काळजाचा ठेका!' अशी टॅगलाइन असलेल्या या चित्रपटातून महाराष्ट्राच्या लोककलेचा आणि लावणी संस्कृतीचा सुंदर आविष्कार पाहायला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे. चित्रपटात ईश्वर आणि ताराबाई अंधारे यांच्यासह अनेक कलाकार आणि तंत्रज्ञ सहभागी आहेत. चित्रपटाचे संगीत हर्षविजय यांनी दिले आहे.
वैदेही परशुरामीची भावुक पोस्ट चर्चेत
'फुलवरा'चा टीझर पाहिल्यानंतर अभिनेत्री वैदेही परशुरामी हिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने 'नटरंग' चित्रपटाशी जोडलेली आपली आठवण सांगितली आहे.
वैदेहीने लिहिले, "ज्या वर्षी 'नटरंग' प्रदर्शित झाला, त्याच वर्षी माझं या क्षेत्रात पदार्पण झालं! एकच विचार, एकच स्वप्न… आपल्याला अशी संधी कधी मिळेल?"
पुढे ती म्हणते, "१७ वर्षांनंतर पुन्हा एकदा हा टीझर बघून तेच स्वप्न, तीच आशा जागृत झाली…! त्यामुळे या चित्रपटाचं पहिलं तिकीट मीच काढणार! प्रचंड उत्सुकता!!!"
तसेच तिने चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन केले आहे. वैदेहीच्या या पोस्टमधून 'नटरंग' आणि मराठी लावणीविषयी तिचे असलेले प्रेम आणि 'फुलवरा'बद्दलची उत्सुकता दिसून येते.
कधी प्रदर्शित होणार 'फुलवरा'?
'फुलवरा' हा चित्रपट १४ जानेवारी २०२७ रोजी मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी स्टुडिओज् आणि अथांश कम्युनिकेशन्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
टीझरमधील लावणीचा ठेका, मराठमोळा अंदाज आणि वैदेही परशुरामीची उत्सुकता पाहता या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे. आता 'फुलवरा' मोठ्या पडद्यावर किती रंगत आणतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा: JFF Awards 2026 Winners List: 'गोंधळ' सर्वोत्कृष्ट चित्रपट, 'मैं वापस आऊंगा' आणि 'हनुमान अंश' यांचाही डंका
