जेएनएन, मुंबई: हिमाचल प्रदेश सरकारने मराठी अभिनेत्री छाया कदम यांना त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी विशेष पुरस्काराने सन्मानित केले. 11 व्या शिमला इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची संधी त्यांना मिळाली होती. याच सोहळ्यात त्यांच्या ‘लाल’ या शॉर्ट फिल्मचे स्क्रिनिंगही झाले.
या विशेष सन्मानाबाबत भावना व्यक्त करताना छाया कदम म्हणाल्या, “हा केवळ माझा सन्मान नाही तर माझ्या महाराष्ट्राचाही आहे. आजवर केलेल्या कामाचा आढावा घेत राज्य सरकारने मला सन्मानित केले, ही माझ्यासाठी भावनिक क्षणांची अनुभूती होती.”
पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांची एक डॉक्युमेंट्री सादर करण्यात आली. त्या निमित्ताने छाया कदम यांनी हिमाचलमधील सांस्कृतिक वारसा, इथल्या माणसांचा गोड स्वभाव आणि विशेष म्हणजे सिनेमा कलाकृतीवर असलेले प्रेम अनुभवण्याची संधी मिळाल्याचे सांगितले. एक कलाकार म्हणून या गौरवामुळे समाधान आणि आनंद लाभल्याचे त्यांनी नमूद केले.
अभिनेत्री छाया कदम यांनी त्यांच्या सोशल मीडियावर या संबंधीची एक पोस्ट शेअर केली यामध्ये त्यांनी लिहिले की, “ हा केवळ माझा सन्मान नाही तर, माझ्या महाराष्ट्राचाही सन्मान आहे.”
11 व्या शिमला इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची संधी तर मिळाली. आणि सोबतच ‘लाल’ या माझ्या शॉर्ट फिल्मचे स्क्रिनिंग असल्यामुळे त्या आनंदात अजून भर पडली. पण या सगळ्या सोबतच एक विशेष गोष्ट अशी घडली की, मी आजपर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेत हिमाचल प्रदेश राज्य सरकारच्या वतीने माझा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्या सन्मानाच्या निमित्ताने दाखविण्यात आलेली माझी लहानशी डॉक्युमेंट्री मला भावनिकरित्या सुखावणारी होती. आणि अर्थात हा सन्मान केवळ माझा नाही तर ज्या मातीने माझ्यातला कलाकार घडविला त्या माझ्या महाराष्ट्राचाही आहे.
या फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्ताने हिमाचल प्रदेश आणि शिमला मधील अनेक सांस्कृतिक गोष्टी अनुभवता आल्या. इथली माणसं - त्यांचे गोड स्वभाव अनुभवता आले. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इथल्या लोकांचे सिनेमा कलाकृतीवर असलेले प्रेम अनुभवता आले. खूप आनंद आणि एक कलाकार म्हणून खूप समाधान.
छाया कदम यांनी फँड्री, सैराट, न्यूड, झुंड, गंगुबाई काठियावाडी, Laapataa Ladies आणि All We Imagine as Light अशा उल्लेखनीय चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतेच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्यांच्या दोन चित्रपटांचे प्रीमियर झाले होते, तसेच Laapataa Ladies हा चित्रपट भारताची ऑस्कर 2025 साठी अधिकृत एन्ट्री ठरला आहे.