जेएनएन, मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांनी नितीन सुपेकर दिग्दर्शित ‘बंधू’ या मराठी चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर विशेष पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. चित्रपटातील कलाकारांचा सहजसुंदर अभिनय, भावाभावांमधील नात्यांचे संवेदनशील चित्रण आणि दिग्दर्शकाने हाताळलेला विषय यामुळे आपण भारावून गेल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, चित्रपट पाहताना अनेक दिवसांनंतर आपल्या डोळ्यांच्या कडा ओलावल्याची भावनिक प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.
नागराज मंजुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "खूप दिवसांनंतर नितीन सुपेकर यांच्या ‘बंधू’ या चित्रपटाच्या तरल भावनेनं बांधून ठेवलं." चित्रपटातील मृण्मयी देशपांडे, मिताली जगताप वराडकर, स्मिता तांबे, रेणुका दफ्तरदार, यशपाल आणि श्रीकांत यादव या कलाकारांच्या अभिनयाचे त्यांनी विशेष कौतुक केले आहे.
जितेंद्र जोशी आणि उपेंद्र लिमये यांच्या अभिनयाने तर त्यांना विशेष प्रभावित केले. भावाभावांमधील नात्यातील विविध भावनांचा पीळ या दोघांनी अत्यंत सहजतेने आणि प्रभावीपणे पडद्यावर उभा केल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, या सर्व कलाकारांमध्ये बालकलाकार शौर्य पाटील याने विशेष लक्ष वेधून घेतल्याचेही मंजुळे यांनी आवर्जून सांगितले. शौर्यच्या सहज आणि निरागस अभिनयाचे त्यांनी मनापासून कौतुक केले.
दिग्दर्शक नितीन सुपेकर यांनी अत्यंत संवेदनशील विषय जीव लावून पडद्यावर साकारल्याचे सांगत मंजुळे यांनी त्यांच्या दिग्दर्शनाचेही कौतुक केले. "खूप दिवसांनी फिल्म बघताना डोळ्यांच्या कडा ओलावत राहिल्या," अशा शब्दांत त्यांनी चित्रपटाने मनाला स्पर्श केल्याची भावना व्यक्त केली. पोस्टच्या शेवटी त्यांनी नितीन सुपेकर आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमला मनःपूर्वक शुभेच्छा देत ‘चांगभलं!’ असेही म्हटले आहे.
दोन भावांच्या नात्याची भावनिक गोष्ट
‘बंधू’ हा २० नोव्हेंबर २०२६ रोजी प्रदर्शित झालेला मराठी कौटुंबिक चित्रपट आहे. नितीन सिंधूविजय सुपेकर यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. दोन भावांमधील प्रेम, मत्सर, संघर्ष, गैरसमज आणि अतूट नात्याचा भावनिक प्रवास या चित्रपटातून मांडण्यात आला आहे.
चित्रपटात उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्यासोबत मृण्मयी देशपांडे, मिताली जगताप वराडकर, स्मिता तांबे, रेणुका दफ्तरदार, यशपाल, श्रीकांत यादव आणि बालकलाकार शौर्य पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
एकीकडे चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक होत असताना दुसरीकडे नागराज मंजुळे यांच्यासारख्या संवेदनशील दिग्दर्शकाने केलेली प्रशंसाही ‘बंधू’साठी विशेष महत्त्वाची ठरत आहे. त्यांच्या या पोस्टमुळे चित्रपटाची आणि त्यातील भावनिक आशयाची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
