जेएनएन, मुंबई: सोनी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर यंदा मनोरंजनाची विशेष मेजवानी पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित सूत्रसंचालन करत असलेल्या या कार्यक्रमात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची संपूर्ण टीम सहभागी होणार असून, या विशेष भागात माधुरीने अभिनेत्री नम्रता संभेरावच्या ‘लॉली’ या लोकप्रिय पात्राची नक्कल केली. तिच्या या अंदाजामुळे मंचावर हास्याची लाट उसळली.
‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात माधुरी दीक्षित स्पर्धक आणि सेलिब्रिटी पाहुण्यांशी मनमोकळ्या गप्पा मारताना दिसते. याच गप्पांदरम्यान ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांशी संवाद साधताना माधुरीने नम्रता संभेरावच्या ‘लॉली’ या पात्राचे कौतुक केले. ‘लॉली’ची भूमिका आपल्याला खूप आवडत असल्याचे तिने सांगितले.
माधुरीच्या या प्रतिक्रियेवर नम्रताने आश्चर्य व्यक्त करत, “तुम्ही माझं हे कॅरेक्टर पाहिलं आहे?” असा प्रश्न विचारला. त्यावर माधुरीने होकार देत नम्रताच्या डेंटिस्टवरील स्किटची आठवण सांगितली. त्यानंतर नम्रताने माधुरीला लॉलीचा एखादा संवाद म्हणून दाखवण्याची विनंती केली. माधुरीनेही क्षणाचाही विलंब न करता “मेरी आँखों में झाँको!” हा लॉलीचा प्रसिद्ध संवाद तिच्या अंदाजात सादर केला. माधुरीने केलेली ही नक्कल पाहून उपस्थित कलाकार आणि प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला.
या संवादादरम्यान नम्रताने लॉली हे पात्र साकारण्यामागील प्रेरणाही सांगितली. लालबागमधील चाळीत बालपण गेल्यामुळे आजूबाजूच्या महिलांचे हावभाव आणि बोलण्याच्या पद्धतींचे निरीक्षण करण्याची संधी मिळाल्याचे तिने सांगितले. याच निरीक्षणांचा उपयोग पात्र साकारताना झाल्याचे नम्रताने स्पष्ट केले.
लॉलीची वेगळी हेअरस्टाईल आपण स्वतः ठरवल्याचेही नम्रताने सांगितले. हे पात्र इतरांपेक्षा वेगळे दिसावे, अशी आपली इच्छा होती. लॉली थोडेफार इंग्रजी बोलते; मात्र आपण उत्तम इंग्रजी बोलत असल्याचा तिला प्रचंड आत्मविश्वास असतो. अशा छोट्या-छोट्या निरीक्षणांना विनोदी पद्धतीने रंगवून लॉली हे पात्र घडल्याचे नम्रताने स्पष्ट केले.
माधुरी दीक्षित आणि नम्रता संभेराव यांच्यातील हा रंगतदार संवाद ‘कोण होणार करोडपती’च्या विशेष भागाचे आकर्षण ठरणार आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांची धमाल आणि माधुरीचा अनोखा अंदाज अनुभवण्यासाठी हा भाग प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे.
‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर पाहता येणार आहे.
हेही वाचा: श्रीदेवींच्या 'इंग्लिश विंग्लिश'ची OTT वर जादू! 14 वर्षांनंतरही नेटफ्लिक्सच्या टॉप 10 मध्ये
