जेएनएन, नागपूर: ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधू कांबीकर यांनी लोककला, रंगभूमी आणि चित्रपट अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी कलाक्षेत्रात आपले स्थान निर्माण केले. पारंपरिक लावणीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी त्यांनी केलेले कार्यही विशेष महत्त्वाचे मानले जाते. 

28 जुलै 1953 रोजी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मालेगाव येथे जन्मलेल्या मधू कांबीकर यांचे मूळ नाव मधू वामन जाधव आहे. त्यांचे बालपण ग्रामीण वातावरणात गेले. वडील कलाकार असल्यामुळे लहानपणापासूनच त्यांना नाटकांची आवड निर्माण झाली. वडिलांसोबत नाटके पाहताना त्यांच्या मनात कलेची बीजे रुजली. शालेय शिक्षणात त्यांचे मन फारसे रमले नाही; मात्र तमाशाच्या फडात त्यांनी आपल्या कलाप्रवासाला सुरुवात केली.

वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी पुण्यात कथ्थक नृत्याचे शिक्षण घेतले, तर वयाच्या तेराव्या-चौदाव्या वर्षी गुरू पांडुरंग घोटीकर आणि लावणीसम्राज्ञी लक्ष्मीबाई कोल्हापूरकर यांच्याकडून लावणीचे धडे गिरवले. नृत्य आणि अभिनयातील कौशल्याच्या बळावर त्यांनी लोककलाविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली. लोककलाकार म्हणून नाव मिळत असतानाच सामाजिक अवहेलनाही सहन करावी लागली; मात्र त्यांनी या अडचणींना न जुमानता आपला कलाप्रवास सुरू ठेवला.

‘शापित’मधील भूमिकेने मिळवून दिली ओळख
मधू कांबीकर यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘शापित’ हा चित्रपट. या चित्रपटात त्यांनी साकारलेली ‘बिजली’ ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनावर ठसली. ग्रामीण स्त्रीचे जीवन, तिचा संघर्ष, तिच्या भावभावना आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची तिची ताकद त्यांनी प्रभावीपणे साकारली. या भूमिकेसाठी त्यांना 1983 मध्ये महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

चित्रपटसृष्टीतील यशापूर्वी त्यांनी प्रभाकर पणशीकर यांच्या ‘पुत्रकामेष्टी’ या नाटकातून रंगभूमीवर काम केले. या नाटकातील अभिनयासाठी त्यांना ‘नाट्यदर्पण’चा विशेष लक्षवेधी अभिनेत्री पुरस्कार मिळाला. त्यानंतर ‘पेईंग गेस्ट’, ‘चंद्र जिथे उगवत नाही’, ‘आकाश पेलताना’ आणि ‘फुलवंती’ यांसारख्या नाटकांतून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली.

महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
‘राघू मैना’, ‘हेच माझे माहेर’, ‘एक होता विदूषक’ आणि ‘रावसाहेब’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. ‘हेच माझे माहेर’मधील अभिनयासाठी त्यांना 1985 मध्ये महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. ‘रावसाहेब’ या चित्रपटातील भूमिकेसाठीही त्यांना 1996 मध्ये राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. गुजराती चित्रपट ‘साद’मधील संवादरहित अभिनयासाठी त्यांना गुजरात राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

    लक्ष्याच्या आईची भूमिका
    ‘एक होता विदूषक’ या चित्रपटातून त्यांनी पारंपरिक लावणी कलावंत स्त्रीचा संघर्ष प्रभावीपणे मांडला. कलेवरील निष्ठा, मुलाविषयीचे प्रेम आणि स्वतःच्या अस्तित्वासाठीची धडपड या भावनांचा सुंदर मिलाफ त्यांच्या अभिनयात दिसून आला. ‘झपाटलेला’मधील लक्ष्याच्या आईची भूमिका तसेच संत गाडगेबाबांच्या जीवनावर आधारित ‘डेबू’ या चित्रपटातील भूमिका त्यांनी लक्षवेधी ठरवल्या. दादा कोंडके यांच्यासोबत ‘येऊ का घरात’, ‘मला घेऊन चला’ आणि ‘ह्योच नवरा पायजे’ यांसारख्या चित्रपटांतही त्यांनी काम केले.

    पारंपरिक लावणीच्या जतनासाठी विशेष प्रयत्न
    मधू कांबीकर यांचे योगदान केवळ अभिनयापुरते मर्यादित राहिले नाही. अस्सल पारंपरिक लावणीचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने त्यांनी लावणीविषयक लिखित साहित्य संकलित करून तमाशाच्या परंपरेचा मागोवा घेण्याचे काम केले. या प्रयत्नांत त्यांच्या तमाशा फडातील कलाकारांनीही महत्त्वाची मदत केली.

    ‘मधुप्रीतम’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी पारंपरिक लावणीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले. ‘सखी माझी लावणी’ हा कार्यक्रम सादर करून त्यांनी पेशवेकालीन लावणीची परंपरा, तिचा इतिहास आणि तिचे सांस्कृतिक महत्त्व रसिकांसमोर मांडले. लावणीच्या बदलत्या सादरीकरणाबाबत त्यांनी वेळोवेळी आपली मते व्यक्त केली आणि पारंपरिक लावणीचे अस्सल स्वरूप जपण्यावर भर दिला.

    लावणीसम्राज्ञी लक्ष्मीबाई कोल्हापूरकर यांच्या नावाने प्रतिष्ठान स्थापन करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला. तसेच ‘ओमप्रीतम’ या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून ‘काटा रुते कुणाला’ या दूरचित्रपटाची निर्मिती केली. चित्रपट, नाटक, लोकनाट्य आणि दूरदर्शन मालिका अशा विविध माध्यमांतून त्यांनी आपली कला सादर केली. ‘संत गाडगे महाराज’, ‘श्रावणधारा’, ‘मुक्ती’ यांसारख्या मालिकांमध्येही त्यांनी काम केले.

    डॉ. श्रीराम लागू यांच्या आत्मकथनात मधू कांबीकर यांच्या नृत्यकौशल्याचे कौतुक
    ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी आपल्या ‘लमाण’ या आत्मकथनात मधू कांबीकर यांच्या नृत्यकौशल्यासोबतच त्यांच्या अभिनयाचेही कौतुक केले आहे. त्यांच्या कलाप्रवासात अनेक चढ-उतार आले, तरी अभिनयावरील निष्ठा आणि लोककलेबद्दलची बांधिलकी त्यांनी कायम जपली.

    डिसेंबर २०१६ मध्ये ‘लावण्य संगीत’ कार्यक्रमाच्या सादरीकरणादरम्यान त्या रंगमंचावर बेशुद्ध झाल्या होत्या. त्यानंतर मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी असल्याचे निदान झाले आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या आरोग्यविषयक अडचणींमुळे त्यांना काही काळ अभिनयापासून दूर राहावे लागले.

    हेही वाचा: Madhu Kambikar Passed Away: ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे दीर्घ आजाराने निधन