जेएनएन, मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील मानाच्या समजल्या जाणाऱ्या फिल्मफेअर मराठी पुरस्कार 2026 सोहळा शुक्रवारी मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात वर्षभरातील उत्कृष्ट चित्रपट, कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार आणि तंत्रज्ञांचा गौरव करण्यात आला. यंदाच्या पुरस्कारांमध्ये 'आता थांबायचं नाय!' या चित्रपटाने सर्वाधिक बाजी मारत सर्वोत्तम चित्रपटासह अनेक महत्त्वाचे पुरस्कार आपल्या नावावर केले.

'आता थांबायचं नाय!'चा दबदबा
'आता थांबायचं नाय!'ला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (शिवराज वायचळ), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (सिद्धार्थ जाधव), सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम, सर्वोत्कृष्ट गीत (मनोज यादव), सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (अजय गोगावले), सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (निहिरा जोशी देशपांडे) आणि सर्वोत्कृष्ट संवाद असे अनेक पुरस्कार मिळाले.

दिलीप प्रभावळकर आणि अमृता सुभाष यांना प्रमुख अभिनयाचे पुरस्कार
'दशावतार' चित्रपटासाठी दिलीप प्रभावळकर यांना सर्वोत्कृष्ट प्रमुख अभिनेता पुरस्कार मिळाला. तर अमृता सुभाष ('जारण') आणि हृता दुर्गुळे ('आरपार') यांनी संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट प्रमुख अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला.

समीक्षकांच्या विभागात 'स्थळ – अ मॅच' आणि 'सबर बोंडा' या चित्रपटांचा गौरव झाला. भूषण मनोज ('सबर बोंडा') आणि तारणाथ खिरटकर ('स्थळ – अ मॅच') यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक) पुरस्कार मिळाला, तर नंदिनी चिकटे ('स्थळ – अ मॅच') यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

'गोंधळ' आणि 'दशावतार'लाही तांत्रिक पुरस्कार
'गोंधळ' चित्रपटाने पटकथा, पार्श्वसंगीत, ध्वनी संयोजन आणि छायांकन अशा तांत्रिक विभागांमध्ये बाजी मारली. 'दशावतार'ला प्रॉडक्शन डिझाइन, वेशभूषा आणि मेकअप या विभागांत पुरस्कार मिळाले.

यंदाचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना प्रदान करण्यात आला.

    फिल्मफेअर मराठी पुरस्कार 2026 : विजेत्यांची संपूर्ण यादी

    • सर्वोत्कृष्ट चित्रपट: अता थांबायचं नाय!
    • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: शिवराज वायचळ (अता थांबायचं नाय!)
    • सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक): जयंत दिगंबर सोमाळकर (स्थळ – अ मॅच), रोहन परशुराम कानावडे (सबर बोंडा)
    • सर्वोत्कृष्ट अभिनेता: दिलीप प्रभावळकर (दशावतार)
    • सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक): भूषण मनोज (सबर बोंडा), तारणाथ खिरटकर (स्थळ – अ मॅच)
    • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: अमृता सुभाष (जारण), हृता दुर्गुळे (आरपार)
    • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक): नंदिनी चिकटे (स्थळ – अ मॅच)
    • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: सिद्धार्थ जाधव (अता थांबायचं नाय!)
    • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: अनिता दाते (जारण)
    • सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम: गुलराज सिंग, सौरभ भालेराव (अता थांबायचं नाय!)
    • सर्वोत्कृष्ट गीत: मनोज यादव (टायटल ट्रॅक – अता थांबायचं नाय!)
    • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक: अजय गोगावले
    • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका: निहिरा जोशी देशपांडे
    • सर्वोत्कृष्ट कथा: जयंत दिगंबर सोमाळकर (स्थळ – अ मॅच)
    • सर्वोत्कृष्ट पटकथा: संतोष डावखर (गोंधळ)
    • सर्वोत्कृष्ट संवाद: शिवराज वायचळ, ओंकार गोखले, अरविंद जगताप (अता थांबायचं नाय!)
    • सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत: इलैयाराजा (गोंधळ)
    • सर्वोत्कृष्ट ध्वनी संयोजन: जयेश ढाकण (गोंधळ)
    • सर्वोत्कृष्ट छायांकन: अमलेन्दू चौधरी (गोंधळ)
    • सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन: संजीव राणे (दशावतार)
    • सर्वोत्कृष्ट संकलन: अभिजित देशपांडे (स्थळ – अ मॅच)
    • सर्वोत्कृष्ट वेशभूषा: सचिन लवळेकर (दशावतार)
    • सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन: स्टॅन्ली डी'कोस्टा (टकुंबा – एप्रिल मे 99)
    • सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शक: सुभोध खानोलकर (दशावतार), रोहन मापुस्कर (एप्रिल मे 99)
    • सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेता: कुणाल शुक्ला (तीन पायांचा घोडा), निशाद भोईर (गोंधळ)
    • सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्री: साजिरी जोशी (एप्रिल मे 99), इशिता देशमुख (गोंधळ)
    • सर्वोत्कृष्ट मेकअप: रोहित महाडिक (दशावतार)
    • सर्वोत्कृष्ट बालकलाकार: कृष मोरे (खालिद का शिवाजी)
    • जीवनगौरव पुरस्कार: राजदत्त

      हेही वाचा: रणबीर-साई पल्लवीच्या 'रामायण'कडून मुख्यमंत्री फडणवीसांच्या मोठ्या अपेक्षा; ऑस्करवर केले भाष्य