जेएनएन, मुंबई: ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार असून, शोच्या पहिल्याच भागातील एका स्पर्धकाचा खास व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. जळगावचे शरद राजपूत हे माधुरी दीक्षित यांचे चाहते असून, त्यांच्या आवडत्या अभिनेत्रीसमोर हॉट सीटवर बसण्याची संधी त्यांच्यासाठी एखाद्या स्वप्नपूर्तीपेक्षा कमी नव्हती.

शोच्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये शरद राजपूत यांचा उत्साह स्पष्टपणे पाहायला मिळतो. ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ जिंकल्यानंतर आनंदाला पारावार न उरलेल्या शरद यांनी चक्क आपला ब्लेझर काढला आणि सेटवरच नाचत जल्लोष केला. विशेष म्हणजे, त्यांनी घातलेल्या टी-शर्टवर माधुरी दीक्षित यांचा फोटो होता. त्यामुळे त्यांच्या या सेलिब्रेशनने उपस्थितांचेही लक्ष वेधून घेतले.

माधुरींच्या एका प्रश्नाने सेटवर पिकला हशा
शरद राजपूत यांच्यासोबत गप्पा मारताना माधुरी दीक्षित यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी शरद यांना त्यांच्या पत्नीबद्दल प्रश्न विचारला.

त्यावर शरद यांनी हसत, “ती माझं सगळं ऐकते,” असं सांगितलं. शरद यांचं उत्तर ऐकताच माधुरी यांनी मिश्किलपणे विचारलं, “ती फक्त ऐकते की कधीकधी ऐकवतेदेखील?” माधुरींच्या या हजरजबाबी प्रश्नावर सेटवर एकच हशा पिकला.

माधुरींच्या सूत्रसंचालनाची नवी इनिंग
‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वातून माधुरी दीक्षित सूत्रसंचालक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांच्या खास अंदाजात होणाऱ्या गप्पा, स्पर्धकांच्या आयुष्यातील प्रेरणादायी कथा आणि भावूक क्षण यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढणार आहे.

माधुरी आणि स्पर्धकांमधील असेच मनमोकळे संवाद या पर्वाचे खास आकर्षण ठरणार आहेत. शरद राजपूत यांचा उत्साह पाहता, कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात प्रेक्षकांना मनोरंजनाची खास मेजवानी मिळणार असल्याचे दिसते.

    ‘कोण होणार करोडपती’चा नवा सीझन १२ ऑक्टोबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता सोनी मराठी आणि Sony LIV वर पाहता येणार आहे.