जेएनएन, मुंबई: लोकप्रिय मराठी मालिका 'रात्रीस खेळ चाले' मधील शेवंता हे पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या भूमिकेला सर्वप्रथम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर यांनी लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर ही भूमिका कृतिका तुळसकर यांनी साकारली. आता या भूमिकेवरून दोन्ही अभिनेत्रींमध्ये अप्रत्यक्ष वाद रंगला असून, त्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
अलीकडेच एका मुलाखतीत अपूर्वा नेमळेकर यांनी 'रात्रीस खेळ चाले' ही मालिका सोडल्यानंतर रिप्लेसमेंट म्हणून आलेल्या अभिनेत्रीने आपल्याशी संपर्क साधला नाही, याबाबत नाराजी व्यक्त केली.
त्या म्हणाल्या, "मी मालिका सोडल्यानंतर माझी जागा घेणाऱ्या अभिनेत्रीचा किमान एक फोन येईल, अशी अपेक्षा होती. मी मालिका का सोडली, हे तिने विचारायला हवे होते. मात्र तसे काही झाले नाही. मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले, कारण प्रत्येकजण तेवढा प्रोफेशनल नसतो."
कृतिका तुळसकर यांचे प्रत्युत्तर
अपूर्वा यांच्या या वक्तव्यानंतर कृतिका तुळसकर यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत त्याला प्रत्युत्तर दिले. व्हिडिओमध्ये त्यांनी नाव न घेता अपूर्वा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली.
कृतिका म्हणाल्या, "'रात्रीस खेळ चाले'मधील अनप्रोफेशनल अभिनेत्री मी आहे, असे म्हणायचे असेल तर त्याला माझे उत्तर आहे. एखादा कलाकार मालिका सोडतो, तेव्हा त्या निर्णयाचा परिणाम संपूर्ण टीमवर होतो. निर्माते लाखो रुपये खर्च करत असतात. अशा वेळी इतर कलाकार, तंत्रज्ञ आणि मालिकेचे भवितव्य याचाही विचार व्हायला हवा."
पुढे त्या म्हणाल्या, "मी कोणाला फोन करून 'तू मालिका का सोडलीस?' किंवा 'तुला काढलं का?' असे प्रश्न का विचारू? आम्ही कधी एकत्र कामही केले नाही किंवा आमची वैयक्तिक ओळखही नव्हती. त्यामुळे असा फोन करणे मला योग्य वाटले नाही. मी माझे काम शंभर टक्के प्रामाणिकपणे केले आहे."
कृतिकाने पुढे असेही स्पष्ट केले की, "माझ्या प्रोफेशनलिझमबद्दल बोलण्याचा अधिकार कोणालाही नाही. ज्या व्यक्तीला आपण कधी भेटलोही नाही, तिच्याविषयी सार्वजनिकरित्या बोलताना विचार करायला हवा. भविष्यात माझ्याबद्दल कोणत्याही माध्यमातून बोलताना थोडा विचार करून बोलावे, एवढीच अपेक्षा आहे."
चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण
अपूर्वा नेमळेकर आणि कृतिका तुळसकर यांच्या या वक्तव्यांनंतर सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी अपूर्वा यांच्या भूमिकेचे समर्थन केले असून, तर काहींनी कृतिका यांनी मांडलेला मुद्दा योग्य असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील शेवंता या भूमिकेवरून सुरू झालेला हा वाद सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
हेही वाचा: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिका सोडण्याच्या अफवांवर दिलीप जोशींची प्रतिक्रिया म्हणाले, "मागे पडण्याचा धोका पत्करून…"
